Just another WordPress site

प्रियजनांमध्येही महिला असुरक्षित, दर ११ व्या मिनिटाला एका ‘श्रद्धा’चा होतो मृत्यू, महिला अत्याचाराच्या वास्तवावर UN चा कटाक्ष

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धाच्या हत्याकांड प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड हा मुख्य आरोपी आहे. श्रद्धा हत्याकांडसारखीच अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली. या प्रकरणामध्ये कधी बॉयफ्रेंड, कधी नवरा तर कधी प्रियकरानेच आपल्या जोडीदाराला संपवल्याचं दिसतं. आता संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनीही धक्कादायक माहिती दिली. गुटेरेस यांनी सांगितले की, दर ११ व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली जाते आणि या अशा प्रकरणात जास्त करुन कधी घरातीलच लोकं असतात तर कधी महिलेचे पार्टनरच तिचा जीव घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बाबी

१. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला
२. जगात दर ११ व्या मिनिटाला होते एका महिलेची हत्या
३. कधी घरातीलच लोकं तर कधी महिलेचे पार्टनरच घेतात जीव
४. संयुक्त राष्ट्र संघाचे एंटोनियो गुटेरेस यांनी दिली माहिती

 

पत्नीवर चारित्र्याचा संशय, जेवणात चुका झाल्या, रागाच्या भरात पत्नीची हत्या, पोटच्या मुलीचा खून, प्रेयसीची हत्या अशा बातम्या आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचतो. पण सर्वात चिंताजनक गोष्ट अशी की, हल्ली वृत्तपत्रातून वाचण्यास येणाऱ्या या बातम्यांमधून महिलांची नात्यागोत्यातील लोकांनीच हत्या केल्याचं वाचायला मिळते. खंरतर घर हे सगळ्यांसाठी सुरक्षीत जागा. पण महिलांसाठी घर हे सगळ्यात असुरक्षित म्हणजे मृत्यूचा सापळा ठरतंय. हेच धक्कादायक या बातम्यामधून पुढं येतंय. श्रद्धाच्या हत्येनंतर महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. जगभरातही अशाच प्रकारची मानसिकता असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली. जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला त्यांच्या विश्वासातली लोकंच, त्यात कुटूंबीय, नवरा, बॉयफ्रेंडच जबाबदार असल्याचंही संयुक्त राष्ट्र संघाने सांगितलं. एंटोनिया गुटेरेस यांनी सांगितले की, महिलां विरोधात घडणाऱ्या या हिंसा मानवाधिकारविरोधी आहेत. त्यांच्या जगण्याचे हक्क बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यासाठी देशातील अस्तित्वात असलेल्या सरकारांनी त्यासाठी राष्ट्रीय कृती आरखडा तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. जगभरात २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील अत्याचारविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गुटेरेस यांनी सांगितलं की, महिला आणि मुलींवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना म्हणजे जगभरात सर्वत्र होत असलेला मानवाधिकारांचा भंगच आहे. जगात सरासरी दर ११ व्या मिनिटाला एका महिलेची अथवा मुलीची तिच्या पतीकडून अथवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या होत असते. घरातील आर्थिक समस्या आणि इतर अडचणींमुळे निर्माण होणारा ताणाचा परिणाम म्हणून महिला किंवा मुलींना शाब्दीक किंवा शारीरिक हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागतो. भारतातील श्रद्धा वालकर या युवतीची हत्या झाल्याच्या ताज्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरचिटणीस गुटेरेस यांनी दाखवून दिलेले वास्तव नागरिकांना आरसा दाखविणारे आहे. गुटेरेस यांनी सांगितले की, महिलांचे ऑनलाईन पद्धतीनेही शोषण केले जात आहे. महिलांच्या विरोधात घाणेरडी शेरेबाजी करणे, पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण आणि त्यांचे फोटो घेऊन त्यामध्ये नको ते बदल करणे या सारख्या घटना आता सर्रासरपणे केल्या जातात. या अशा प्रकारामुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत आहेत. अशा गोष्टींमुळे मुक्तपणे जीवन जगण्यावर मर्यादा पडतात. तसेच यामुळे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांच्या होणाऱ्या हत्येमुळे एंटोनिया गुटेरेस यांनी अनेक देशातील सरकारला जाहीर आवाहन केले आहे की, महिला आणि मुलींविरोधोत घडणाऱ्या वाईट घटनाविरोधात कडक पावले उचला. यासाठी प्रत्येक देशातील सत्ताधारी लोकांनी सामान्य माणसांची मदत घेऊन राष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी एक राष्ट्रीय कृती आरखडा बनवा. त्याबरोबरच महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या ज्या विविध संघटना आहेत, त्यांचा निधी वाढवण्या संदर्भातही विचार केला जावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. महिलांवरच्या हिंसाचाराचं प्रमाण कमी करायचं असेल तर समाजात जागरूकता आणवी लागेल. महिलांप्रती आदराची, सन्मानाची भावना वाढिस लावणं, महिलांवरच्या अत्याचाराचे खटले जलदगतिने निकाली काढणं, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगिलतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!