Just another WordPress site

सेक्सटॉर्शन म्हणजे काय? नेमकी कशी होते फसवणूक? सेक्सटॉर्शनला बळी पडू नये म्हणून काय दक्षता घ्यायला हवी?

सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. राजस्थानमधील गुरुगोठडी हे गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं. तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. याच निमित्ताने सेक्सटॉर्शन म्हणजे नक्की काय? कशी होते फसवणूक? कोणते लोक याला जास्त बळी पडतात ? आपण काय दक्षता घ्यायला हवी? याच विषयी जाणून घेऊ.

 

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?

सेक्स + एक्स्टॉर्शन (Sex + Extortion) यावरून सेक्स्टॉर्शन हा शब्द आलाय. म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणं. यात पैशाच्या रूपात खंडणी मिळवण्यासाठी किंवा लैंगिक सुख मिळवण्यासाठी व्यक्‍तीच्या लैंगिक प्रतिमा किंवा माहिती सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक छळ केला जातो. चॅटिंगशी संबंधित वेगवेगळ्या सोशल मीडियाचा यात वापर केला जातो. मुलीच्या नावाने एखादी बनावट प्रोफाइल तयार केली जाते. त्या प्रोफाईलवरून अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. एकदा का फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली की त्यानंतर चॅटिंग सुरु करून घट्ट मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो. मोबाईल क्रमांक मिळवला जातो आणि त्यानंतर चॅटिंगचं रूपांतर व्हिडीओ कॉलमध्ये केलं जात. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मादक अदा दाखवून तरुणांना भुरळ पडण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतः नग्न होऊन समोरच्या व्यक्तीला देखील कपडे काढण्यासाठी प्रोत्साहित केलं जात. नग्न तरुणी बघितल्यानंतर अनेकदा तरुण आपले कपडे उतरवण्यास तयार होतात आणि तरुण नग्न झाल्यानंतर नकळत व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो, फोटोही काढले जातात. एकदा का त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड झाले की त्यानंतर सुरु होते ऑनलाइन ब्लॅकमेलींग. संबंधित तरुणांना त्यांचेच नग्न फोटो, व्हिडीओ पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं धमकी सत्र सुरु होत. या ब्लॅकमेलिंगमध्ये व्हिडिओ इंटरनेटवर किंवा जवळच्या मित्रांना पाठवले जाण्याची धमकी दिली जाते. जर व्हिडीओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर पैशांची मागणी केली जाते. शक्य होईल तितके पैसे उकलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा या सर्व प्रकाराला ‘सेक्स्टॉर्शन’ म्हणतात. त्यामुळे या प्रकारापासून सावध राहणे गरजेचे आहे.

 

खंडणी देऊन प्रकरण संपतं का?

तुम्ही केलेलं पहिलं पेमेंट ही फक्त सुरूवात असते. तुम्ही एकदा पैसे दिले की वारंवार खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करुनही खंडणी मागितली जाते. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून चालणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण हे रॅकेट एवढं मोठं आहे, की अजूनही खंडणी उकळणं सुरूच आहे.

 

कोणते लोक याला जास्त बळी पडत आहेत ?

या सगळ्यासाठी वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया वापरणाऱ्या कोणालाही अशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं. चॅटिंग अॅप्स, डेटिंग अॅप्समध्ये ‘तरुण’ मोठ्या प्रमाणावर गुंतले असतात. त्यामुळे त्यांनाच या सगळ्यासाठी लक्ष केलं जातं. आयुष्यात एकटेपणा ज्यांना जाणवतो ते लोक सेक्स्टॉर्शनला जास्त प्रमाणात बळी पडत असल्याचं एका माहितीतून समोर आलं. वैवाहिक जीवनात जर काही कलह असतील, आपल्या जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण होत नसतील, कमी वयात घटस्फोट होऊन एकटेपणा आला असेल तर असे लोक सेक्स्टॉर्शनच्या आहारी जातात. तर तरुण आणि किशोरवयीन मुलांना सेक्सबद्दल असलेलं अप्रूप त्यांना या गोष्टीकडे आकर्षित करतं आणि ते सेक्स्टॉर्शनचे बळी पडतात.

 

तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण नगण्य

कॉल संपताच पैशांची मागणी करण्यासाठी मेसेज येतो. ५ हजार ते २-३ लाखांपर्यंतची रक्कम मागितली जाते. पैसे न देता पोलीस स्टेशन गाठणं हा एकमेव पर्याय यात आहे. तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कारण, या जाळ्यात अडकल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, जी कुणासमोर सांगताही येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कुणीही अनोळखी व्यक्तीच्या नादाला लागू नका आणि संभाव्य धोक्यापासून स्वतःचं संरक्षण स्वतः करा.

 

सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?

सेक्स्टॉर्शनचं बळी न पडणं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. सर्वप्रथम तर जर एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती पडताळणी केल्याशिवाय स्वीकारू नका. आपला मोबाईल नंबर त्यांना शेअर करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हिडीओ कॉल स्वीकारणं पूर्णतः टाळा. कुणी अशाप्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर सर्वप्रथम जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा.
सेक्सटॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणुक करणाऱ्याने असे व्हिडीओ कुठे पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी धमकावले जाते. त्यामुळे अशी फसवणुक झाली तर सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करा. आपली बदनामी होईल, हा विचार करू नका. कारण जर कोणी तुमचा असा व्हिडिओ बनवला तर तुम्ही गुन्हेगार नसून व्हिडिओ बनवणारा गुन्हेगार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरण्याऐवजी तक्रार करा.

कायद्याचं संरक्षण

अशा गुन्हेगारांना IPC च्या कलम २९२ नुसार अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या गुन्ह्याखाली २ वर्षाची शिक्षा होऊ शकते. तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षांचा कारावास आणि दंडही होऊ शकतो. एखाद्याचा विवस्त्रावस्थेतील फोटो काढला तर कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल होतो. हाच फोटो जर सोशल साइट्सवर, व्हॉटसअ‍ॅपवर पसरवला तर कलम ३५४ बरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल होतो. कारण असं करणं हे २००० च्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यातलं कलम ६६ ई नुसार खासगीपणाचं उल्लंघन ठरतं. यामध्ये विना वॉरंट अटक करण्याची तरतूद असते. संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो काढणे, प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे हा आयटी कायद्याच्या कलम ६६ अ अन्वये गंभीर गुन्हा मानला जातो. याशिवाय, फोटो किंवा व्डिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्यास आरोपीवर १८६० च्या भारतीय दंडसंहितेचं खंडणीविरोधातलं कलम ३८७ लागू केलं जातं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!