Just another WordPress site

एफडी मध्ये कोण पैसे ठेवू शकतं? कमीत कमी किती रुपयांची एफडी करता येते?

बँकेत किंवा पोस्टात FD करणं म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक असं आजही म्हटलं जातं. बँकेत FD मध्ये ठेवलेले पैसे कुठेही जात नाहीत. गरजेच्या वेळी ते उपयोगी पडतात त्यामुळे अनेक नागरिक आजही बँक किंवा पोस्टात आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून FD पर्याय निवडतात. पण बऱ्याच जणांना एफडी विषयी माहिती नसतं. याच विषयी जाणून घेऊ.

 

एफडी काय आहे?

ज्यांना पैशांबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी हे एक उत्कृष्ट गुंतवणुकीचे साधन आहे. कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देते. तथापि काही कंपन्यांकडून देखील गुंतवणूकदारांकडून मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. संपत्तीत वाढीपेक्षा स्थिर, सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांनी मुदत ठेवी खात्यांमध्ये पैसा घालणे आदर्श ठरेल.
तुम्ही जेव्हा मुदत ठेवीत गुंतवणूक करता, तेव्हा तो पैसा बँकेकडून तिचा कर्ज व्यवसाय चालविण्यासाठी वापरला जातो. म्हणजे एका परीने तुम्ही बँकेलाच तुमचा पैसा ठरावीक मुदतीसाठी वापरायला देत असता, बँक त्या बदल्यात तुम्हाला व्याज रूपाने परतावा देते. शिवाय ठेवी करीत असताना जे व्याज बँकेकडून ठरविला जातो, तोच संपूर्ण मुदतीच्या काळात, बाजारात कितीही उलथापालथ झाली आणि व्याजदर वर-खाली झाले तरी स्थिर व अपरिवर्तनीय राहतो.
मुदत ठेवींमधून जरी लोकांना स्थिर व निश्चित उत्पन्नाची हमी दिली असली, तरी हा परताव्याचा दर मात्र म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या समान गुंतवणुकीच्या तुलनेत लक्षणीय कमी असतो. तुलनात्मक विश्लेषणातून अधिक स्पष्ट चित्र सादर करू शकेल. अर्थात परतावा वाढण्याबरोबरच जोखमीचा घटकही वाढत असतो हे देखील ध्यानात घेतले पाहिजे.

 

FD मध्ये कोण पैसे ठेवू शकतं?

१८ वर्षांवरील ज्या व्यक्तीचं बँक खात्यामध्ये अकाउंट आहे तो ग्राहक FD साठी पैसे ठेवू शकतो. याशिवाय खासगी आणि पब्लिक कंपन्या, पार्टनरशिप फर्म, सोसायटी देखील FD खात्यात पैसे ठेवू शकतात.

 

FD चा कालावधी किती असतो?

एफडीचा कालावधी ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत तुम्ही ठेवू शकता. काही बँका २० वर्ष ठेवण्याची मुदत देतात. कमीत कमी ९ ते १२ महिन्यांसाठी देखील काही बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा नियम असतो.

 

टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक इन कालावधी किती असतो?

टेक्स सेव्हिंग एफडीचा कालावधी ५ वर्षांचा असतो. या दरम्यान तुम्ही पैसे काढू शकत नाही.

 

कमीत कमी किती रुपयांची FD करता येते?

बँका आणि एनबीएफसीद्वारे एफडी उघडण्यासाठी किमान ठेव रक्कम १००० रुपये निश्चित केली गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किमान ठेवींचे निकष कमी असू शकतात, तर खासगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांनी किमान पाच हजार रुपये ठेव निश्चित केली आहे. टॅक्स सेव्हिंग एफडी तुम्ही १०० रुपयांपासून सुरू करू शकता.

 

FD च्या व्याजावर कर लागतो का, तो किती असतो?

हो, जर व्याज ४० हजार किंवा त्याहून अधिक असेल तर टॅक्स भरावा लागतो. १० टक्के TDS भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यांना ५० हजार रुपयांहून अधिक व्याज असेल त्यांनाच कर लागेल.

 

FD साठी पॅनकार्ड आवश्यक आहे का?

तुमच्याजवळ पॅनकार्ड नसेल तर तुम्ही ६०/११ फॉर्म भरून FD खातं उघडू शकता. बँकेत FD खातं उघडण्यासाठी पॅन आवश्यक आहे. ऑनलाइन FD साठी देखील पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे.

 

FD मोडली तर किती पेनल्टी घेतली जाते?

FD वेळेआधी मोडली तर १ टक्के पेनल्टी घेतली जाते. तुम्हाला FD वर लोन घेता येतं मात्र अशावेळी FD मोडता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!