Just another WordPress site

रोखीने २० हजाराहून अधिक रक्कम देणं-घेणं कायद्यानं गुन्हा, काय आहेत रोख व्यवहार करण्याचे नियम?

इथून पुढं तुम्हाला तुम्ही घाम गाळून कमावलेला पैसाही मनमुराद खर्च करता येणार नाही. कारण साधा दहा हजारांपेक्षा जास्त रकमेचा रोखीचा कोणताही व्यवहार अन् फक्त दोन हजारांपेक्षा जास्त रकमेची देणगी तुम्हाला चांगलीच गोत्यात आणू शकते. ऐकून धक्का बसला ना. पण हो हे अगदी खरंय. त्यामुळं रोखीने व्यवहार करण्याचे नेमके काय नियम आहेत ? या विषयी जाणून घेऊ.

खरंतर देशात डिजिटल आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पैशांचा रोख व्यवहार कमी करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक निर्णय घेतेय. ज्यामध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देतेय. मात्र ऑनलाईन पेमेंटवर मर्यादा आहेत. त्यामुळं लोक अनेकदा लोक रोखीनं व्यवहार करतांना दिसतात. पण, जशा ऑनलाईन पेमेंटवर मर्यादा आहेत, तशाच मर्यादा रोखीनं व्यवहार करण्यावरही आहेत.

२० हजाराहून जास्त रक्कम रोखीने स्वीकारू नये

आयकर कायद्याच्या कायद्याच्या कलम २६९ एसएसनुसार २० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तो चेक किंवा डीडी असायला हवा. २० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम व्यक्ती रोखीने स्वीकारू शकत नाही. २० हजार रुपयांपेक्षा अधिक रोखीने कर्ज घेणं किंवा देणं याविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद आहे. कलम २७१ ड मध्ये या कृतीचा उल्लेख आहे. त्यात सांगितलंय की, जर एखाद्या व्यक्तीने २० हजारांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज रोखीने घेतले किंवा दिले आणि कर विभागाने त्याला पकडले, तर त्या व्यक्तीला कर्जाची रक्कम किंवा कर्जाच्या रकमेएवढा दंड भरावा लागू शकतो.

२ लाखांची रोख स्विकारू नका

आयकर विभागाने जारी केलेल्या नियमामध्ये सांगितलं की, एका दिवसात एका व्यक्तीकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ नये. ही रक्कम एका व्यवहारात असो किंवा अधिक. असं केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

अचल संपत्तीसाठी २० हजारांपेक्षा जास्त कॅश नको

अचल संपत्तीच्या घेव-देवीच्या व्यवहारांसाठी तुम्हाला २० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने घेणं आणि देणं गुन्हा आहे. असं केल्यास दंड भरावा लागू शकतो.

१० हजाराहून जास्त रक्कम अदा करणे धोक्याचे

बिझनेस आणि प्रोफेशनल खर्चासाठी १० हजार रुपयांपेक्षा अधिक कॅश देणं टाळावं. हा नियम अशा व्यक्तींनी लक्षात ठेवायला हवा जे व्यवसाय करतात. किंवा वकील, सीए, डॉक्टर आणि प्रोफेशनल जे मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात.

२ हजारांपेक्षा जास्त दान रोखीने नको

कोणत्याही नोंदणीकृत संस्था किंवा राजकीय पक्षाला दान देताना २ हजारापेक्षा पेक्षा जास्त रक्कम रोखीनं देणं टाळावे. यापेक्षा जादाची रक्कम दान करायची असल्यास चेक, डिजिटल किंवा पॉलिटिकल बाँडचा वापर करावा. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसंच काही प्रकरणांत कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावं लागू शकतं.

बँक एफडी

बँकेच्या एफडीमध्ये रोख जमा करण्याची परवानगी आहे, मात्र, एफडीत १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम नसावी. हे ठेवीदार आणि बँक दोघांसाठीही चांगलं नाही. ज्या बँकेच्या एफडी खात्यात या मर्यादेपेक्षा जास्त ठेवी असतील त्या ठेवीदार आणि ठेवी जमा करणारे दोघांनाही आयकरद्वारे नोटीस येऊ शकते.

सेविंग-करंट अकाउंट

बचत खात्यात रोख जमा करण्याची मर्यादा १ लाख रुपये आहे. एखाद्या व्यक्तीने बचत खात्यात १ लाखाहून अधिक रोख रक्कम जमा केल्यास आयकर विभाग त्याला नोटीस पाठवू शकतो. चालू खात्यासाठी ही मर्यादा ५० लाख रुपये आहे. यावर जमा केल्यास आयकर विभाग आपल्याविरूद्ध कारवाई करू शकते.

म्युचुअल फंड, स्टॉक मार्केट, बॉन्ड, डिबेंचर

जे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉन्ड्स किंवा डिबेंचरमध्ये पैसे गुंतवतात त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की एका वेळी १० लाखाहून अधिक रोख रक्कम जमा करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्याने आपल्याविरुध्द कारवाई होऊ शकते.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

क्रेडिट कार्ड बिल जमा करताना रोखीच्या ठेवींबद्दल सावधगिरी बाळगा. क्रेडिट कार्ड बिल एकावेळी १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कमेमध्ये जमा करता येणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन केल्यास आयकर विभाग आपल्याला नोटीस बजावू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!