Just another WordPress site

कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत

भारत स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो आणि वर्षभर त्याची चोख अंमलबजावणीही केली जाते. हा अर्थसंकल्प देशाचं भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. पण आज अशा अर्थमंत्र्यांविषयी जाणून घेऊ, जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर देखील राहिले होते.

चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना सी.डी. देशमुख म्हणूनही ओळखलं जायचं. ते देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला माहीत असतीलच. पण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले पहिले भारतीय अर्थमंत्रीही राहिले आहेत. सी.डी. देशमुख हे भारतीय सनदी अधिकारी होते. त्यांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास २१ वर्षीची होती. मध्य प्रांतात त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली. पुढे १९३९ च्या जुलैमध्ये सी.डी. देशमुखांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. त्यानंतर दोनच वर्षात म्हणजे १९४१ साली मणिलाल नानावटी यांच्या जागी सी. डी. देशमुख RBI चे डेप्युटी गव्हर्नर झाले. त्यानंतर १९४३ साली RBI चे गव्हर्नर जेम्स टेलर यांचं निधन झालं. टेलर यांच्या निधनानंतर रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला, तो सी. डी. देशमुखांच्या रुपानं. ११ ऑगस्ट १९४३ रोजी सी.डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. ते ३० जून १९४९ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर सीडींना भारताच्या व्हॉईसरॉयमार्फत ‘नाईटहूड’ बहुमान देण्यात आला.

खरंतर शासकीय आणि प्रशासकीय पदांची सी.डी. देशमुख यांच्या आयुष्यात कधीच वानवा नव्हती. १९६९ साली राष्ट्रपतीपदाची निवडणूकीत ते पराभूत झाले. हे एक पद वगळता, सी.डींनी अपयश पाहिलं नाही. आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरच नाही, तर पुढे केंद्रीय अर्थमंत्रीही झाले. १९५० मध्ये त्यांचा देशाचे अर्थमंत्री म्हणून नेहरूंच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. १९५६ पर्यंत ते देशाचे अर्थमंत्री राहिले. जास्तीत जास्त अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या बाबतीत त्यांचे नाव चौथ्या क्रमांकावर येते. स्वतंत्र भारतात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी यांनी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. त्यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी नऊ वेळा, प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा आणि यशवंत सिन्हा, यशवंत राव चव्हाण आणि सीडी देशमुख यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सीडी देशमुख यांना अर्थसंकल्पात अनेक ऐतिहासिक बदल करण्याचे श्रेय जातं. सीडी देशमुख यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची प्रत इंग्रजी आणि हिंदीत छापण्यात आली. पूर्वी बजेटची प्रत फक्त इंग्रजी भाषेतच छापली जायची. यासोबतच अर्थसंकल्पाच्या पद्धती, स्वरूप आणि उद्दिष्टांमध्ये मोठे बदल घडवून आणणारे अर्थमंत्री म्हणूनही देशमुख यांची आठवण होते. त्यांच्या कार्यकाळातच देशात पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!