Just another WordPress site

संयुक्त राष्टाचा इशारा, २५ कोटी लोक उपासमारीच्या दारात, जगावर घोंगावतेय अन्न टंचाईचे संकट

युक्रेनवरील रशियन आक्रमणाने युद्धभूमीपासून खूप दूर असलेल्या कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात आले. कोविड-१९, हवामान बदल आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कमकुवत झालेली जगाची अन्न व्यवस्था युद्ध उद्ध्वस्त करतेय. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव ५३ टक्क्यांनी वाढले. शिवाय, युक्रेनमधून धान्य आणि तेलबियांची निर्यात जवळपास थांबली. या सगळ्या कारणांमुळे जगात अन्नटंचाईचे संकट निर्माण झाले.

 

महत्वाच्या बाबी

१. जगात अन्नटंचाईचे संकट निर्माण झाले
२. अनेक देशांनी उत्पादनाची निर्यात थांबली
३. जगात २५ कोटी लोक उपासमारीच्या दारात
४. अन्नटंचाईमुळे देशांनी उपाययोजना करावी- बिस्ली

 

चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं गव्हाची निर्यातबंदी करण्याची घोषणा केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं जगातील अनेक देशांमध्ये गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं भारतानं देशात असलेल्या गव्हाच्या साठ्यातून कोणतीही निर्यात न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण, जगात अन्न टंचाई निर्माण झाल्याचं सांगितल्या जातं.
युक्रेनमधून दरवर्षी ४० कोटी लोकांना पुरेल इतक्या अन्नधान्याची निर्यात होते. रशिया हा खतांचा दुसऱ्या क्रमांकावरील मोठा निर्यातदार देश आहे. हे दोन्ही देश एकमेकांशी युद्धात गुंतल्याने निर्यात थांबली आणि अन्नधान्य तसेच खतांचा पुरवठा थांबला गेला. खतांचा पुरवठा नसल्याने अनेक देशांमधील पीकांवर परिणाम होणार असून त्याचा फटका पुढील वर्षीच्या अन्नधान्य उत्पादनावर होणार आहे. शिवाय, सध्याही काही प्रमाणात जगावर अन्नटंचाईचे संकट असल्याने सर्व देशांनी आताच सावध व्हावे आणि उपाययोजना करावी, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डेव्हिड बिस्ली यांनी दिला.
खतांचा पुरवठा अत्यंत विस्कळीत झाल्याने अन्नधान्य उत्पादनाचे संकट उभे राहिले असून हा पुरवठा सुरळीत केला नाही तर, पुढील वर्षी जगभरात अन्नटंचाईचे मोठे संकट निश्‍चितपणे येईल, असा इशारा बिस्ली यांनी दिला.
सध्या आफ्रिका खंड, इराण, येमेन, बांगलादेश, अफगाणिस्ता, इंडोनेशिया, श्रीलंका, चिली या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न टंचाई निर्माण झाली. जगात मुख्य अन्नपदार्थांच्या चढ्या दरांमुळे ४४ कोटी ते १ अब्ज ६० कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळण्याची शक्यता नाही. सुमारे २५ कोटी लोक उपासमारीच्या दारात आहेत. रशिया आणि युक्रेन जगाला २८% गहू, २९% बार्ली, १५% मका आणि ७५% सूर्यफूल तेल पुरवतात. रशिया आणि युक्रेन लेबनॉन, ट्युनिशियाच्या गरजेच्या अर्धा आणि लिबिया तसंच इजिप्तच्या दोनतृतीयांश धान्याचा पुरवठा करतात. युक्रेन ४० कोटी लोकांना धान्य पुरवतो. मात्र, या देशांनी सध्या निर्यात बंदी केल्याचं डेव्हिड बिस्ली यांनी सांगितलं आणि जगाला परिस्थितीची जाणीव करून दिली.
पाच वर्षांपूर्वी जगातील साधारण आठ कोटी जणांना भुकेची समस्या होती. यात आता चौपटीने वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ देशांमधील एकूण पाच कोटी लोक तीव्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. आपण या लोकांपर्यंत आताच पोहोचून त्यांना मदत केली नाही तर, दुष्काळ, भूकबळी, अस्थिरता, स्थलांतर असे चक्र सुरु होईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
सध्या जगभरात एकूण सात अब्ज ७० कोटी लोकांना पुरेल इतक्या अन्नधान्याचे उत्पादन होते. मात्र, यापैकी ५० टक्के उत्पादन हे खतांच्या जोरावर होते. खतांच्या वापराशिवाय पुढील वर्षी उत्पादन पुरेसे होणार नाही. खतांचा सर्वांत मोठा उत्पादक असलेल्या चीनने खतनिर्यात बंद केली आहे, तर रशियावरच निर्बंध असल्याने त्यांच्या खते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळं अन्न टंचाईचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिणामी जगात राजकीय अशांतता वाढेल, मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम आणि उपासमार होईल. त्यामुळं आगामी काळात जगातील अनेक देशांपुढील पहिले आव्हान असेल लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करणं हे आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!