Just another WordPress site

काय सांगता! ‘या’ गावातील लोक करतात चक्क सांपांची शेती, सापांचं उत्पादन घेऊन काय करतात?

सापाचे नाव ऐकताच जवळपास सर्वांचाच थरकाप उडतो. साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, ज्याच्या चाव्यामुळे माणसांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगात एक अशीही जागा आहे जिथे सापांची शेती केली जाते. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. चीनमध्ये एक गाव आहे की, तेथे ही शेती केली जाते. याच गावाविषयी आणि इथल्या सापाच्या शेतीविषयी जाणून घेऊ.
जगात धान्य, फळे, भाजी आणि अन्य प्रकारची शेती केली जाते. मात्र, असा एक देश आहे की, जिथं चक्क विषारी सापांची शेती केली जाते. चीनच्या जिसिकियाओ गावात लोक सापांना घरात ठेवतात. एवढेच नाही तर या सापांमुळेच हे लोक घर चालवतात. सामान्यतः लोक उपजीविकेसाठी अनेक प्रकारची कामे करतात, मात्र सापांची शेती खरोखरच आश्चर्यकारक आहे. हे भलतच धाडस या गावातील लोक करतात. इथं अनेक प्रकारचे ३० लाखांहून अधिक विषारी साप पाळले जातात. सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक दुसरी व्यक्ती सापाच्या शेतीशी संबंधित आहे. या गावातील लोकांनी या सापांना आपले उत्पन्नाचे मुख्य साधन बनवले.
या गावात पूर्वी चहा, ज्यूट, कापसाच्या शेतीबरोबरच मच्छीपालनाचा व्यवसाय केला जात असे. नंतर १९८० मध्ये पहिल्यांदा सापांची शेती करण्यात आली होती, असे सांगितले जाते. याचाच अर्थ गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील लोक शेतात पिकं घेण्याऐवजी साप पाळण्याचे काम करत आहेत. चीनमध्ये सापाच्या मांसाची मोठी मागणी असते. यामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने साप विकून मोठी कमाई करतात. वास्तविक, चिनी औषधांमध्ये विषारी सापांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे हे साप खूप उपयोगी पडतात. एक हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या या गावात १०० हून अधिक स्नेक फार्म आहेत. यावरून सापांच्या व्यापाराचा अंदाज बांधता येतो. त्वचेचे आजार बरे करण्यापासून ते कॅन्सरच्या औषधांपर्यंत सर्व गोष्टींसाठी या सापांचा उपयोग होतो. याशिवाय, सांपाची कातडी वेगळी करून वाळवली जाते. नंतर इतर वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसंच सापाचे मांस आणि त्याच्या शरीराचे अन्य अवयवांची बाजारात विक्री करतात. महत्वाचं म्हणजे, यासोबतच उन्हाळ्यात सापांची पिल्ले पाळली जातात आणि हिवाळ्यात अमेरिका, दक्षिण कोरिया, रशिया, जर्मनीसह जगातील अनेक देशांमध्ये या सापांची विक्री केली जाते. याशिवाय हे लोक सापांचे विष विकूनही पैसा कमवत असतात.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!