Just another WordPress site

काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष, राजस्थानचं नेतृत्व पायलट यांच्याकडे नको, ८२ आमदारांचे राजीनामे, कॉंग्रेस पुढं मोठा पेच

सध्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु आहे. असं असतांनाचा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचीय. मात्र, पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार गेहलोत यांना सीएमपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यामुळं गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांची निवड होणार असल्याच्या चर्चेनंतर ८० हून अधिक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यानं कॉंग्रेस समोर मोठा पेच निर्माण झालाय.

 

महत्वाच्या बाबी

१. महाराष्ट्रानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष
२. गेहलोत आणि पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन वाद
३. नव्या संघर्षामुळं काँग्रेस हायकमांड पुढं मोठा पेच
४. राजस्थानचं नेतृत्व आता कोणाकडे जाणार? याकडे लक्ष

 

साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होतेय. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक घेतली जातेय. या निवडणूकीसाठी अशोक गेहलोत रिंगणात उतरले. गेहलोत यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी चाचपणी सुरू झाली. रविवारी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय होणार होता. त्यासाठी आमदारांची बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच एकाएकी काँग्रेसच्या तब्बल ८० हून अधिक आमदारांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यामुळं राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मोठं राजकीय संकट उभं राहिलं.
गहलोत गटाचे आमदार हे पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशी यांच्याकडे दिले. त्यामुळं पायलट यांच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरवात झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे एक व्यक्ती, एक पद यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी गेहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, हे पद त्यांनी सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र, ते अशोक गेहलोत आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नसल्याचं यातून दिसतंय.
गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०८ आमदार आहेत. या बैठकीला काँग्रेसचे फक्त २५ आमदार हजर होते. त्यामुळे पायलट यांच्या विरोधात वातावरण तापल्याचे सर्वांना पाहायला मिळाले. कॉंग्रेसमध्ये हा नवा पेच निर्माण झाल्यानं गेहलोत आणि पायलट यांना चर्चेसाठी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले असून या बैठकीत पक्षातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं बोललं जातं. मात्र, गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्ती मुख्यमंत्री होणार नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. कारण पुढच्या वर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री केले तर पायलट गटातील नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे धाडस करणार नाही, असं जाणकारांना वाटतं.
दरम्यान, गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. अपक्ष आमदार संयम लोढा यांनी आम्ही अशोक गेहलोत यांच्या सोबत असल्याचं सांगितलं. त्यामुळं गेहलोत विरुध्द पायलट हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं दिसतं. दरम्यान, काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी केली जाईल, या राहुल गांधी यांच्या विधानामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद विराजमान होण्याची सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होते का, की गेहलोत समर्थकांचे मन सांभाळण्यासाठी कॉंग्रेस सीएम पदासाठी तिसऱ्या कुणाचं नावं सुचवतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!