Just another WordPress site

ऐन दिवाळीच्या दिवसात ग्राहकांना महागाईचा झटका, दूध दरात मोठी वाढ; नेमकी काय आहेत दूध दरवाढीची कारणं?

चहा, कॉफी असो किंवा दही, ताक आणि पनीर.. दूध आणि दुधाचे पदार्थ हा अनेक भारतीयांच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण याच दुधाच्या किंमती आता भरमसाठ वाढल्या आहेत. फक्त पॅकेटबंद, ब्रँडेड दुधच नाही, तर सुटं दुधही महाग झालंय. तेही ऐन सणासुदीच्या दिवसांत. दरम्यान, दुधाच्या दरात किती वाढ झाली? या दरवाढीची नेमकी कारणं काय? याच विषयी जाणून घेऊ.

महत्वाच्या बाबी

१. ऐन दिवाळीच्या दिवसात ग्राहकांना महागाईचा झटका
२. दूध संघाने केली दुधाच्या दरात कमालीची वाढ
३. पशुखाद्याचे भाव महागल्याने वाढले दुधाचे दर
४. लम्पी आजाराचाही दुधाच्या दरावर झाला मोठा परिणाम

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे जनता महागाईने होरपळली. त्यातच आता दूध खरेदी करणंही महागलंय. कारण, राज्यभरात दूध खरेदी आणि विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक संघाने घेतला.

 

दूध दरात कितीने झाली वाढ?

दिवाळी सण तोंडावर आलेला असताना अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली. तर म्हशीच्या दूध खरेदीच्या दरात ‘गोकुळ’ने २ रुपयांची वाढ केली. तसेच गायीच्या दूध खरेदीच्या दरात ‘गोकुळ’ने ३ रुपयांची वाढ केली. अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे ६१ रुपयांवरून ६३ रुपये झाली. गायीचे दूध आता ५३ रुपये प्रतिलिटरपासून ५५ रुपये प्रतिलिटर झाले.

आता पाहूया दुधाच्या किमती एवढ्या का वाढल्या?

 

दूध उत्पादनात घट

दूधाच्या एकूण उत्पादनात ७ ते १० % घट निर्माण झाली. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांसाठी दूध महाग झाले. शिवाय, दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्चही वाढला असून दुधाचे दर वाढले.

 

वैरणीची कमतरता

महागाईच्या विळख्यात जसं जग सापडलं, तसाच भारतही सापडला. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य आणि चाराही महाग झाला. मुसळधार आणि काही प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे देशातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागतोय. मान्सूनच्या दिवसांत हिरवा चारा मुबलक उपलब्ध असतो. पण यंदा अति आणि अनियमित पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली. याचे प्रमाण जवळपास २६ % इतके आहे. याशिवाय कोरड्या वैरणीची उपलब्धता २५ % नि कमी झाली. सध्यस्थितीत सुयोग्य वैरण व्यवस्थापनासाठी देशातील एकूण उत्पादनक्षम जमिनी पैकी ८.५ % जमीन ही गवताळ असायला हवी जी सध्यस्थितीत प्रत्यक्षात ४.५ % इतकीच आहे. परिणामी, चाऱ्याचं जे ५-६ किलोचं बंडल पन्नास रुपयाला मिळायचं ते आता ७० ते ७५ रुपयांना मिळतं.

 

पशुखाद्याच्या दरातील वाढ

जनावरांना घालण्यात येत असलेले पारंपारिक अन्न म्हणजे कोंडा. ते विकत घेणे आता कठीण होऊन बसले आहे. एका पेंढ्याची किंमत ७०० ते ८०० रुपये अशी झाली आहे. तर कडबा पेंढीचा दर शेकडा १५००-१८०० इतका वधारला. गेल्या वर्षभरात तयार पशुखाद्याच्या किंमतींमध्येही २० टक्क्यांची वाढ झाली. त्याचाही दूध दरवाढीवर परिणाम झाला.

वाहतुक खर्च वाढला

गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पशुखाद्य, दूध आणि दूधाचे पदार्थ यांच्या वाहतुकीवरील खर्चही वाढला आहे.

 

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव

गुजरात, राजस्थान पंजाब आणि ईशान्य भारतात आसाममध्येही काही ठिकाणी गुरांमध्ये लंपी व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. या रोगामुळे आतापर्यंत सुमारे १ लाख दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २० लाखांहून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली. परिणाम दूध उत्पादनावर झाल्यानं दर वाढले.

 

जीएसटी

केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणांतील बदलांचाही दुधाच्या किंमतीवर परिणाम झाला असल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात. भारतात याआधी पाकीटबंद दुधावर जीएसटी नव्हता. पण आता पाकीटबंद दुधावरही पाच टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या दुधाच्या किमती आणि हा कर यांमुळे पाकीटबंद दुधाच्या किमती वाढल्या आहेत.

दरम्यान येत्या काळात दुधाचे दर आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचेसंचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!