Just another WordPress site

नोटांवर पेनानं काही लिहिल्यास त्या नोटा चलनातून बाद ठरतात का? काय आहे सत्य? काय सांगतो RBI चा नियम?

रोख आर्थिक व्यवहारांसाठी आपण चलनी नोटांचा वापर करतो. पण, बऱ्याचदा या नोटांवर काहीतरी मजकूर लिहिला असल्याचं पाहायला मिळतं. नोटांवर मजकूर लिहिल्याने त्या लवकर खराब होतात आणि त्यांचे आयुर्मान कमी होतं. पण तरीही काही नोटांवर असा मजकूर लिहिल्याचं पाहायला मिळतं. अशा नोटा कोणी आपल्याला दिल्या तर आपण त्या नाकारतो. दरम्यान,
तुमच्याकडे असलेल्या नोटांवर पेनानं लिहिलं असेल तर ती चालणार नाही. त्या नोटेची किंमत शून्य असेल. मग ती नोट १०० रुपयांची असो नाहीतर २ हजार रुपयांची…त्या नोटेला काहीच किंमत नाही…असा दावा करणारा मेसेज सध्या व्हायरल होतोय. नव्या नियमानुसार पेनानं लिहिलेली नोट, तसंच फाटलेली नोट चलनातून बाद होते. हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, ५०, १००, २००, ५००, २००० रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असेल तर त्या चलनातून बाद असतील. त्या नोटा चालणार नाहीत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पैसे हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. नोटा या एकाकडून दुस-याकडे, दुस-याकडून तिस-याकडे फिरत असतात. अनेकदा आपल्याकडेही फाटलेल्या, लिहिलेल्या नोटा येत असतात. त्यामुळे, या दाव्यात किती तथ्य आहे याची माहिती आम्ही बँकेकडून मिळवली.

नेमकं खरं काय?

मात्र या व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या नोटांवर मजकूर लिहिलेला आहे, अशा नोटा अवैध ठरत नाहीत, असं `पीआयबी`नं ट्विटमध्ये म्हटलं. पीआयबीने सांगितल की,
– व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे
– पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होत नाहीत
– स्वच्छ नोट पॉलिसीच्या धोरणांनुसार नोटांवर काही लिहू नये
– पेनानं लिहिल्याने नोटांचं आयुष्य कमी होतं
– खराब, फाटलेल्या नोटा बँकेत बदलून मिळतात

असं असलं तरी नोटांवर लिहू नका. यामुळे नोटेचं आयुष्य कमी होतं. काही दुकानदार अशा नोटा घेत नाहीत. आमच्या पडताळणीत पेनानं लिहिलेल्या नोटा चलनात चालणार नाहीत हा दावा असत्य ठरला. आरबीआयनेही अशा फेक मेसेजेसवर विश्वास ठेऊ नये, ते फॉरवर्ड करू नये असे आवाहन केलंय.

आरबीआयचा नियम काय सांगतो?

१९९९ मध्ये आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी जाहीर केली, तेव्हापासून नोट आणि नाण्यांचां पुरवठा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. लोकांना नोटांवर लिहू नका असे आवाहन करण्यात आले आणि बँकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय नोट बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिजर्व बँकेच्या निर्देशानुसार बँकांनी खराब झालेल्या, फाटलेल्या नोटांऐवजी चांगल्या नोटा बदलून द्याव्या.

कोणत्या नोट बदलल्या जात नाहीत?

ज्या नोट जळालेल्या असतात किंवा एकमेकांना घट्ट चिकटलेल्या असतात, ज्या वेगळ्या करताना पुर्णपणे फाटू शकतात. अशा नोटा बदलल्या जात नाहीत.

नोट बदलताना या गोष्टी लक्षात ठेवा

एखादी नोट जर बदलायची असेल तर त्यावर ती नोट जारी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, हमी, वचन देण्यात आल्याचा मजकूर, स्वाक्षरी, अशोक स्तंभाचे प्रतिक/ महात्मा गांधींचे चित्र, वॉटरमार्क या गोष्टी असणे बंधनकारक आहे. या नोटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत, कोणत्याही खाजगी क्षेत्रातील बँकेच्या करन्सी चेस्ट शाखेत किंवा आरबीआयच्या कोणत्याही जारी करण्यात आलेल्या कार्यालयातील काउंटरवर बदलल्या जाऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!