Just another WordPress site

बजेट कुठं छापलं जातं? बजेट बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानबध्द करून नजरकैदत का ठेवल्या जातं?

बजेट हा शब्द आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आपल्या उत्पन्नातून किती पैसे आपण कशाकशावर खर्च करणार याच्या अंदाजाला आपण सर्वसाधारणपणे बजेट असं म्हणतो. दरवर्षी सादर होणाऱ्या या बजेटकडे अर्थात अर्थसंकल्पाकडं सगळ्यांचे लक्ष लागलेलं असतं. आर्थिक २०२३-२३ साठी देशाचं बजेट सादर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली देशाच्या अर्थ मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीये. दरम्यान, अर्थसंकल्पापूर्वी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवलं जाते, हे तुम्हाला माहित आहे का? असं का केलं जातं? याच विषयी जाणून घेऊ.

अर्थसंकल्प कोण तयार करतं?

देशातील कोट्यवधी सामान्य लोक नोकरी किंवा रोजंदारीवर काम करतात. महिन्याकाठी खर्चाचा ताळेबंद करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. मग तुम्ही विचार करा की, देशाचा संपूर्ण वर्षभराचा ताळेबंद म्हणजेच बजेट तयार करणं हे किती मोठं आव्हान असेल? देशाच्या सर्व गरजा पूर्ण करणं, विविध मंत्रालय आणि राज्याच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद करणं, हे खरचं सोपं काम नाही. ही एक मोठी आणि किचकट प्रक्रिया असते. यात तज्ञांचा सल्ला, नियोजन, अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश असतो.
बजेट बनवण्यासाठी प्रत्येक मंत्रालयाचा सल्ला घेतला जातो. तर अखेरचा अर्थसंकल्प तयार करताना वित्त सचिव, महसूल सचिव आणि खर्च सचिव यांची भूमिका विशेष महत्त्वाची असते. हे सर्व अर्थमंत्र्यांना खर्च आणि कमाईचे अंदाजे तपशील सादर करतात. आणि जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत बैठका सुरूच असतात. इतकंच नाही तर अनेक क्षेत्रातील तज्ञ देखील बजेट टीममध्ये काम करतात. तसंच अर्थमंत्र्यांच्या बजेट टीमला मुख्य आर्थिक सल्लागाराचीही गरज असते. तसेच पंतप्रधानही या टीमला वेळोवेळी मार्गदर्शन देत राहतात. त्याचबरोबर अनेकवेळा विविध संघटनांच्या मागण्या आणि सूचनांवरही बदल केले जातात.

अर्थसंकल्प कुठं छापला जातो?

देशाचा अर्थसंकल्प कसा छापला जातो? त्यासाठी काय गोपनियता पाळली जाते? अर्थसंकल्प संसदेपर्यंत कसा येतो? याचीही एक मोठी आणि गोपनिय प्रक्रिया आहे. राजधानी दिल्लीत संसद भवनाच्या समोरुन एक रस्ता रायसीना हिलकडे जातो. १९२९ रोजी रायसीना हिलची निर्मिती झाली. याच ठिकाणी नॉर्थ ब्लॉक नावाच्या इमारतीला भारताचे अर्थ मंत्रालय म्हणूनही ओळखले जाते. देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे, हे या इमारतीमधील अधिकाऱ्यांचे मुख्य काम आहे. अर्थमंत्रालयाच्या तळघरामध्ये अत्याधुनिक प्रिंटिंग प्रेस आहे. तिथं हा अर्थसंकल्प छापला जातो. या अर्थसंकल्पात सर्वात शेवटी अर्थमंत्र्यांचं भाषण छापलं जातं. अर्थमंत्र्यांना वाटल्यास ते रात्री १० वाजताही त्यांच्या भाषणात फेरबदल करु शकतात. अर्थसंकल्पाच्या अलीकडे अडीच हजार प्रती छापल्या जातात, या अगोदर ही संख्या आठ हजार एवढी होती. अडीच हजारांपैकी जवळपास ८०० प्रती खासदारांसाठीच असतात. अर्थसंकल्पाची छपाई आणि पॅकिंग पूर्ण झाल्यानंतर विशेष सुरक्षेत अर्थसंकल्पाचा दस्तावेज संसद भवनात आणला जातो.

अर्थसंकल्प बनवणारे अधिकारी स्थानबध्द का केल्या जातं?

निवडक अधिकारी बजेट दस्ताऐवज तयार करतात. त्यात अर्थमंत्रालयाचे जवळपास २५० आणि पीआयबीचे जवळपास १०० कर्मचारी असतात. हे कर्मचारी २४ जानेवारीपासून प्रिंटिंग प्रेसमध्ये तळ ठोकून असतात. बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरण्यात येणारे सर्व संगणक एकमेकांपासून डी-लिंक करण्यात येतात. जेणेकरून बजेटमधील माहिती लिक होऊ नये. दुसरं म्हणजे, बजेट हा एक अत्यंत गोपनीय दस्तावेज आहे. त्यामुळं बजेटशी संबंधित कोणताडी डेटा हा बाहेर जाऊ नये म्हणून बजेट तयार करणारे सर्व अधिकारी १० दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहतात. त्यांना बाहेर येण्याची परवानगी नसते. एवढचं काय तर अर्थसंकल्पासाठी काम करणारे अधिकारी घरी देखील जात नाहीत. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही तिथेच केली जाते. संसदेत बजेट सादर होईपर्यंत आणि अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांना तळघरात राहावं लागतं. या बजेट बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांना मोबाईल बाळगण्याचीही मुभा नसते. आपल्या नातेवाईकांशी बातचीत करण्याचीही त्यांना परवानगी देण्यात येत नाही. यादरम्यान, जर कोणतीही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील मंत्रालयात उपस्थितीत असते. इतकंच नाही तर अर्थ मंत्रालयात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळं सामान्य लोक नॉर्थ ब्लॉकच्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाहीत, एवढा बंदोबस्त त्याठिकाणी लावला जातो. केवळ बजेट दस्तऐवज तयार करणाऱ्या टीमलाच नाही तर त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाण्यास किंवा सहकाऱ्यांना भेटण्याची मनाई असते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!