Just another WordPress site

न्यूयॉर्कमध्ये Human Composting परवानगी, काय असतं ह्युमन कम्पोस्टिंग? ह्युमन कंपोस्टिंग कसं तयार केलं जातं?

झाडं, फळं- फुलं, इतर वनस्पतींपासून किंवा सूक्ष्मजीव कीटकांपासून खताची निर्मिती करणं आपण ऐकलं असेल. आता ही काही वेगळी गोष्ट राहिली. पण, आता मानवी मृतदेहापासून सुद्धा खताची निर्मिती करण्यात येतंय, असं जर मी सांगितलं. तर तुम्हाला तर नवल वाटेल. पण हो खरंय. आता न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने नुकतंच ह्युमन कंपोस्टिंगला मान्यता दिलीये. याच निमित्ताने ह्युमन कंपोस्टिंग म्हणजे काय? ह्युमन कंपोस्टिंग कसं केलं जातं? याच विषयी जाणून घेऊ.

ह्युमन कंपोस्टिंग म्हणजे काय?

माणूस मेल्यानंतर वेगवेगळ्या समाजात त्याच्या अंत्यसंस्कारच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुणी दहन करतं, तर कुणी दफन करतं. पण आता मानवी मृतदेहापासून खताचे उत्पादन केलं जाणार आहे. आता एखादी व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. म्हणजेच दहनविधि किंवा दफनविधी केले जाणार नाहीत. तर मृतदेहाचे कंपोस्टिंग करून त्याचं खतामध्ये रूपांतर केलं जातं. मृतदेहाचे खत सदृश मातीमध्ये रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेलाच ह्यूमन कंपोस्टिंग म्हणतात.

ह्युमन कंपोस्टिंगला पहिल्यांदा कोणी दिली परवानगी?

अमेरिकेतील पाच राज्यांनी ह्युमन कम्पोस्टिंगसंबंधीच्या कायद्याला मंजुरी दिलीये. नुकतीच न्यूयॉर्कने या कायद्याला मंजुरी दिल्याने, असा कायदा करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील सहावे राज्य ठरलंय. २०१९ मध्ये वॉशिंग्टनने सर्वात प्रथम ह्यूमन कंपोस्टिंग प्रक्रियेला परवानगी दिली होती. त्यापाठोपाठ कोलोराडो आणि ओरेगॉन या राज्यांनी २०२१ मध्ये तर कॅलिफोर्नियाने सन २०२२ मध्ये या कायद्याला मंजुरी दिली होती. ह्युमन कंपोस्टिंगच्या निर्णयामुळं एखाद्या व्यक्तीला आपल्या मृत्यूनंतर शवाचं रुपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.

ह्युमन कंपोस्टिंग कसं केलं जातं?

ह्युमन कंपोस्टिंगसाठी मृतदेहाला एका स्टीलच्या सिलेंडरमध्ये ठेवले जातं. त्या मृतदेहासोबत काही रसायने ठेवली जातात. याशिवाय, मृतदेहासोबत काही लाकडाचे तुकडे, अल्फाल्फा आणि सुकलेल्या पेंढ्याही ठेवल्या जातात. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ३० दिवसांचा कालावधी लागतो. महिन्याभराच्या या रासायनिक प्रक्रियेनंतर त्या मृतदेहाचे मातीमध्ये रूपांतर होते. त्यानंतर तयार झालेली माती कुटुंबीयांकडे सोपवली जाते. कुटुंबियांना हे खत सुपूर्द करण्यापूर्वी त्याची काळजीपूर्वक तपासणी केली जाते आणि त्या मातीमध्ये किंवा खतामध्ये हानिकारक द्रव्य नाहीत ना हे काळजीपूर्वक तपासलं जातं. नंतरच ते खत कुटुंबियांना दिले जाते. ही माती फुलं, फळं आणि भाज्यांसाठीही खत म्हणून वापरली जाऊ शकते.

एका मृतदेहापासून किती खत बनतं?

ह्युमन कंपोस्टिंग करणाऱ्या रिकॉम्पोज या कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे एका मृतदेहापासून साधारण ३६ पोती खताची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र, ज्या व्यक्तीचा मृत्यू हा टीबीमुळं मृत्यू झालाय किंवा मृत्यूपूर्वी ज्या रेडिएशन थेरपी केली आहे अशा व्यक्तींना मात्र ह्युमन कंपोस्टिंगची परवानगी दिली जात नाही

ह्युमन कंपोस्टिंग पर्यावरणासाठी फायदेशीर आहे का ?

सध्याच्या काळात तापमान बदलामागे मोठ्या प्रमाणावर होणारं कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे एक प्रमुख कारण आहे. ह्युमन कंपोस्टिंगवर काम आणि संशोधन केलेल्या रिकम्पोज या अमेरिकन संस्थेने दावा केलाय की, ह्युमन कंपोस्टिंगमुळे पारंपरिक अंत्यविधीच्या तुलनेत एका टनापेक्षाही अधिक कार्बन वाचवलं जाऊ शकतं. याशिवाय, पारंपरिक पध्दतीनं होणाऱ्या अत्यंविधीसाठी लाकूड आणि जमीन यांसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करावा लागतो. या तुलनेत ह्युमन कंपोस्टिंग हा पर्याय अधिक पर्यावरणपूरक आहे, असं जाणकार सांगतात.

ह्युमन कंपोस्टिंगला होतो विरोध

ह्युमन कंपोस्टिंग काहींच्या मते अधिक पर्यावरणपूरक असलं तरी त्याबद्दल अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कॅथलिक धर्मगुरूंनी या निर्णयाला विरोध केलाय. मानवी शरीराला घरातल्या कचऱ्याप्रमाणे वागणूक देणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

ह्युमन कंपोस्टिंगला खर्च किती येतो?

अमेरिकेत ही सेवा पुरवणाऱ्या रिकम्पोज नावाच्या कंपनीने यासाठी येणाऱ्या खर्चाची तुलना अंत्यविधींच्या इतर पद्धतींशी केली. दहन तसंच दफन या दोन्ही पद्धतींना येणाऱ्या खर्चाइतकाच खर्च ह्युमन कंपोस्टिंगसाठीही येतो असा कंपनीनं दावा केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!