Just another WordPress site

गहू लागवड कशी करावी? गव्हाच्या पेरणीसाठी जमीन कशी असावी अन् कधी करावी पेरणी?

परतीच्या पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची झळ ताजीच असताना आता शेतकरी रबी हंगामासाठी जमीनीची मशागत करतोय. गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास ३ टक्के भागीदारी आहे. सुमारे ७५-८०% गहू चपातीसाठी वापरला जातो. तसेच गव्हाचा उपयोग बेकरीमध्ये पाव, बिस्कीट, केक असे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. दरम्यान, गव्हाची लागवड कशी करावी? याच विषयी जाणून घेऊ.

 

जमीन कशी असावी?

मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन गहू पिकास मानवते. बागायती गव्हासाठी भारी आणि खोल जमीन निवडावी. मध्यम प्रकारच्या जमिनीत रासायनिक खतांसोबत भरखते जमिनीत मिसळल्यास गव्हाचे चांगले उत्पादन घेता येते. जिरायत गहू घेत असताना तो भारी जमिनीतच घ्यावा, म्हणजे पावसाच्या पाण्याचा ओलावा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

 

पूर्व मशागत कशी करावी?

गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुसीत जमिनीची निवड करावी. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १० ते १२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे.

 

पेरणी कधी करावी?

जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने एकरी १ क्विंटल उत्पादन कमी मिळते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

 

उशिरा पेरणीसाठी वापरायचे वाण

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी एनआयएडब्लू-३४, एकेएडब्लू-४६२७, फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) या सरबती वाणांची निवड करावी. प्रतिएकरी ५० ते ६० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह एकेरी पद्धतीने १८ सें.मी. अंतरावर पेरावे.

 

बिज प्रक्रिया करा

गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

 

खत व्यवस्थापन कसे करावे?

जिरायत पेरणीसाठी १६ किलो नत्र आणि ८ किलो स्फुरद प्रति एकरी पेरणीवेळी द्यावे. तर बागायत पेरणीसाठी २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद आणि १६ किलो पालाश प्रतिएकरी पेरणीच्या वेळी द्यावे. तसेच २४ किलो नत्र प्रतिएकरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.

 

उशिरा पेरणी झाल्यास काय करावं?

बागायतमधे उशिरा पेरणी झाल्यास प्रत्येकी ४० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रतिएकरी पेरणीच्या वेळी व १६ किलो नत्र प्रतिएकरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे. लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत ८ किलो फेरस सल्फेट हे ४० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून नंतर द्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!