Just another WordPress site

कार्तिकी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाची झडप.. भरधाव कार दिंडीत घुसली, ८ जणांना जागीच चिरडलं

सांगोला : कार्तिकी एकादशी चार दिवसांवर आली असताना कार्तिकी एकादशी सोहळ्याला पायी दिंडीतून निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना घडली आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर एक कार काळ बनून आली. भरधाव कार दिंडीत घुसल्याने आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली

कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत मागून कार घुसली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात आठ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा वारकरी जखमी असल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ( क्रमांक एमएट १२ DE ८९३८ ) दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे –
शारदा आनंदा घोडके (६१ वर्ष)
सुशीला पवार
रंजना बळवंत जाधव
गौरव पवार (१४ वर्ष)
सर्जेराव श्रीपती जाधव
सुनिता सुभाष काटे
शांताबाई शिवाजी जाधव
एकाचे नाव समजू शकले नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!