Just another WordPress site

“पुढच्या निवडणुकीत अमरावतीचा खासदार हा प्रहार संघटनेचा असेल”

अमरावती : ‘‘अमरावती जिल्ह्याचा खासदार हा अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघ ठरविणार आहे. आम्ही आमदार आहोतच. पण, पुढच्या निवडणुकीत अमरावतीचा खासदार हा प्रहार संघटनेचा असेल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती संघटनेचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली.

आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादानंतर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचा मेळावा आयोजित कऱण्यात आला आहे. त्यात आमदार पटेल बोलत होते. आमदार पटेल म्हणाले की, बच्चू कडू यांनी मला विधानसभेचे तिकिट दिले. त्यांनी सांगितले की तुम्ही लढा; पण मैदान सोडून जाऊ नये. प्रहारच्या तिकिटावर मी विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेलो आहे. आज आपल्याला संधी मिळाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार संघटनेच्या सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत.

असा कोणता आमदार आहे की तो सत्तेत बसणार नाही. मी आमदार झाल्यापासून माझ्या मतदारसंघातील धरणाचे ७५ टक्के काम आहे. ती अपूर्ण कामे आम्हाला पूर्ण करायची आहेत. जनतेच्या हिताची कामे पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते भलतेच आमच्यावर काहीतर आरोप लावत आहेत. आम्हाला प्रेमाने गुहाटीला घेऊन गेले. आम्ही पडलो आदिवासी आम्हाला कुठं माहित आहे विमानात बसायचं. शिंदे साहेब म्हणाले प्लेनमधून जाऊ. मी म्हटलं जाऊ. कारण मी यापूर्वी विमानात कधी बसलोच नाही. आता मला काय माहिती ते मला कशासाठी घेऊन गेले आहेत, असा किस्साही राजकुमार पटेल यांनी सांगितला.

गुहाटीवरून आल्यानंतर राज्यात उलटफेर झाला. आम्ही केलं काय उलटपालट. आमच्या मतदारसंघासाठी आम्हाला निधी मिळावा, यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. विकासासाठी आम्ही सत्तेच्या सोबत राहणार आहोत. प्रहार जनशक्ती संघटनेचे आम्ही कार्यकर्ते आहोत. चांगल्या-वाईट दिवसांत आपण बच्चू कडू यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहनही आमदार पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!