Just another WordPress site

कापूस उत्पादकांना अच्छे दिन, दरात पुन्हा वाढ, पांढऱ्या सोन्याने ९ हजारांचा टप्पा गाठला

गेल्या हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळे साहजिकचं यंदा कपाशीचा पेरा वाढला होता. हवामान अनुकूल राहिल्यास उत्पादनही वाढेल आणि कापसाचे दर कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तसे गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात घसरण झाल्याने भाव ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. त्यानंतर कापसाचा बाजार स्थिरावला होता. आता पुन्हा पांढऱ्या सोन्याने ९ हजारांचा टप्पा गाठलाय.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कापसाच्या शेतीतून पैसे मिळत असतात. राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाची केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत आणि खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जातेय. कापूस उत्पादक शेतकऱ्याचं अर्थकारण कापसाला मिळणाऱ्या भावावर अवलंबून असतं. यंदा कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू झाला. मात्र, परतीच्या पावसामुळे हंगाम चांगलाच लांबला. दिवाळीपर्यंत कापसाचे दर फारच कमी होते. हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस कापसाचे बाजारभाव प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या घरात होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा कापसाचे मार्केट डाउन होऊन कापसाचे दर सात हजार ३०० ते सात हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. अशातच आता तीन दिवसांपूर्वी कापसाच्या भावाने पुन्हा उचल खाल्लानं आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु झाले. काल दरात मोठी घट झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. पदेशातही काही बाजारांमध्ये कापसानं वाढ नोंदवली. सध्या ९ हजार रुपयांचा टप्पा कापसाने गाठलाय. गेल्या चार दिवसांमध्ये कापसाच्या दरात ३००-४०० रुपयांची क्विंटलमागे वाढ झाल्याचे दिसून येतंय. तर अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला ९ हजार ७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच बाजार समितीत आवकही वाढल्याचं चित्र दिसून आलं. तर परभणी जिल्ह्यातील मानवत बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ६५० ते ८ हजार ७१५ रुपयांचा भाव मिळाला. कापसाचे भाव वाढल्यानं शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळालीये खरी. पण, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला मिळत असलेला भाव हा कमीच असल्याची खंत शेतकरी व्यक्त करताहेत. गतवर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते. कधी नव्हे तो कापसाला तब्बल १४ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. शिवाय हा दर कायम वर्षभर टिकूनही राहिला होता. यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव राहणार असं बळीराजाला वाटलं. मात्र, यंदाचे दर गेल्या वर्षीच्या मानाने दर घसरलेलेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून दरवाढीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!