Just another WordPress site

पाचोर तालुक्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका, कापसाचे मोठं नुकसान, बळीराजा हताश

जळगाव : यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उरलेसुरले पीक शेतात असताना गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने तडाखा दिला असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात परतीच्या पावसाने पाणी आणले.

 

महत्वाच्या बाबी

१. पावसाचा तडाखा बसल्यानं पिकांचे मोठे नुकसान
२. पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल
३. पिकांचे नुकसान झाल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी
४. पीक लागवडीचा खर्चही निघणं आता झालं मुश्कील

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शेतात पाणी साचले. या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं कापूस, मका, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांच मोठं नुकसान झालं. ऐण सणासुदीच्या दिवसात दोन-तीन दिवस अवकाळी पावसाने पाचोर तालुक्‍यात हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर दिवाळीच्या तोंडावर दुःखाचे सावट पसरले. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला. एकीकडे दिवाळी तर दुसरीकडे पिकांचे नुकसान, यामुळे बळीराजा हातात आलेले पीक, तोंडचा घास हरवल्याने हवालदिल झाला. पाचोर तालुक्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद या पिकाचे, तर संत्रा आणि मोसंबी या फळाबागांचे देखील मोठे नुकसान झाले. कापसाला देखील परतीच्या पावसाच्या फटका बसला. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील शेतकरी श्रीराम गरबड ब्राम्हणे यांनी शेतात सुमारे आठ एकर कपाशीची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने तडाखा दिल्यानं त्यांच्या कपाशीचे पिकाचे सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले.

तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहे. काही ठिकाणी बोंडे फुटून त्यावरील कापूस भिजल्याने कपाशीचेही नुकसान झाले. पाचोरा तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळ पासूनच पाचोरा तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीसाठी नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी वर्ग हा दुहेरी फेऱ्यात अडकला.

पिकांचा पीक विमा घेतला असेल त्यांनी लगेच टोल फ्री नंबर वर किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊलोड करून विमा कंपनीला ७२ तासाच्या आत तक्रार ऑनलाइन करावी, असं शासनाकडून सांगण्यात येतं. मात्र, तक्रार कशी आणि कुठे करायची याबाबत कुठलेही माहीती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. एकीकडे खर्च वाढत असताना दुसरीकडे मात्र उत्पन्न कमी येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून शेतीवर मोठा खर्च केला होता. फवारणी, निंदणी करुन खते देऊन पिके वाढवली. मात्र, पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.दरम्यान, कापूस लागवडीसाठी लावलेला खर्चही निघणंही कठीण झाल्यानं कुटूंबाची गुजराण आता कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!