Just another WordPress site

तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वास घेण्याचीही असते विशिष्ट पद्धत, ‘ही’ पध्दत अवलंबवा, आयुष्य बदलेल

आपण सगळेच जण प्रत्येक घटकेला श्वास घेत असतो; पण श्वासोच्छ्वासाकडे कधीच म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. श्वास कसा घ्यायचा हे आपल्याला कोणीही शिकवत नाही. शांतपणे आणि दीर्घ श्वास घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरंतर श्वास हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. जोपर्यंत आपल्या शरीरात श्वास येत आणि जात आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहोत. त्यामुळेच ऑक्सिजनला प्राणवायू असं म्हटलं गेलं आहे. आपल्या शरीरात जितक्या योग्य पद्धतीने मुबलक ऑक्सिजनचा प्रवेश होतो, तितकं आपल्या फ्रेश आणि ताजंतवानं वाटत असतं. योग्य प्रकारे श्वास घेणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य आणि क्षमता या दोन्ही बाबी इतरांच्या तुलनेत अधिक चांगल्या असतात. मात्र अनेकांकडून श्वास घेण्याबाबत अशा काही चुका होतात, ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. पूर्ण क्षमतेने श्वास घेण्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

 

शुद्धीत श्वास घ्या

शुद्धीत श्वास घेणे याचा अर्थ आपल्या श्वासोच्छ्वासाबाबत जागरुक असणे. आपले आपल्या श्वसनावर लक्ष असणे. अनेकदा आपलं कामाच्या गडबडीत आपल्या श्वासांकडे लक्ष राहत नाही. जेव्हा जेव्हा आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे जातं, तेव्हा तेव्हा आपण दीर्घश्वसन करत असतो. मात्र लक्ष गेलंच नाही, तर मात्र आपला श्वास उथळ राहतो. सतत उथळ श्वसन सुरू राहिल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा लवकर संपते आणि वारंवार थकवा आल्याची भावना निर्माण होते.

 

नाकाने श्वास घेणे

निसर्गाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक अवयवाचं काम ठरलेलं असतं. तोंड खाण्यासाठी, डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी असतात. त्याचप्रमाणं श्वास घेण्याचं काम हे नाकाचं असतं. मात्र अनेकजण नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतात. रात्रीदेखील काहीजण तोंड उघडं ठेऊन झोपतात. अशा व्यक्तींना वारंवार घसा सुकल्याचा अनुभव येतो आणि त्यांच्या झोपेचा दर्जा इतरांपेक्षा चांगला नसतो. नाकाने श्वास घेतल्याने तो योग्य प्रकारे फिल्टर होतो आणि श्वसनसंस्थेतून योग्य प्रकारे आपल्या फुफ्फुसांमध्ये सोडला जातो. फुफ्फुसात श्वास पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दबावासह केवळ नाकानेच श्वास घेतला जाऊ शकतो. तोंडाने नाही. शिवाय हवेतून आपल्या शरीरात येणारे विविध अनावश्यक घटक हे नाकाद्वारे श्वसन करताना अडवले जातात आणि शुद्ध हवा शरीरात जाते.

 

पोटाने श्वास घ्या, छातीने नको

लहान बाळाला श्वास घेताना कधी पाहिलंय? त्याचं पोट सतत वरखाली होत असतं. श्वास घेण्याची हीच सर्वात योग्य पद्धत आहे. श्वास हा पोटापासून घ्यावा आणि सोडावा. त्यामुळे श्वसनाचा खरा फायदा शरीराला होता. पोटापासून घेतल्या जाणाऱ्या श्वसनामुळे ऑक्सिजन पूर्ण शरीरभर पसरतो आणि व्यक्ती सतत उत्साही राहते.

 

मंद श्वास घ्या, घाईने नको

श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया घाईघाईत करू नये. दीर्घ श्वास शक्य तितक्या कमी वेगाने घेणे आणि तितक्याच कमी वेगाने बाहेर सोडणे आवश्यक आहे.

 

श्वास सोडण्यावर लक्ष द्या

जेव्हा लोकांना श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं जातं, तेव्हा बहुतांशजण केवळ येणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवतात. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचं आहे श्वास सोडण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणं. जर तुमची फुफ्फुसं प्रत्येक वेळी पूर्ण मोकळी होत असतील, तर पुढचा श्वास पूर्ण क्षमतेनं घेऊ शकतील.

 

डिस्क्लेमर – श्वासोच्छासाबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!