Just another WordPress site

चीनमध्ये मोठी दुर्घटना! हेनान प्रांतातील कारखान्याला भीषण आग, ३६ जणांचा होरपळून मृत्यू

चीन : चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. चीनच्या हेनान प्रांतातील आन्यांग शहरात एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच, स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
ही आग इतकी भयंकर लागली होती, की ती आटोक्यात आणण्यासाठी कित्येक तास लागले. या घटनेची माहिती देताना सरकारी माध्यमांनी सांगितलं की, आग विझवण्यासाठी २०० हून अधिक बचाव कर्मचारी आणि ६० अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आग वेनफेंग जिल्ह्यातील कैक्सिंडा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडला लागली. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून अग्निशमन दलाच्या ६३ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. स्थानिक वेळेनुसार, रात्री ८ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली आणि रात्री ११ पर्यंत पूर्णपणे विझवण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत या आगीत ३६ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, अहवालानुसार अद्याप दोन जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, चीनमध्ये आग लागल्याच्या घटना काही नवीन नाही. मार्च २०१९ मध्ये, शांघायपासून २६० किमी अंतरावर असलेल्या यानचेंग येथील एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये ७८ लोक ठार झाले. यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. तर २०१५ मध्ये, चीनच्या सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक, उत्तर टियांजिनमधील एका गोदामात झालेल्या प्रचंड स्फोटात १६५ लोक ठार झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!