Just another WordPress site

बायकोवर नराधमांनी केला अत्याचार; बदनामीला घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या, भोकरदन तालुक्यातील घटना

जालना : भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. काही विकृत नराधमांनी एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार केला. तसंच सदर विवाहितेशी फोनवर केलेल्या अश्लील संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्याच पतीला पाठवले. या घटनेनंतर समाजात बदनामी होईल या भीतीने महिलेच्या पतीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी मला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन माझ्यासोबत अश्लील चाळे केले. मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंधही ठेवले.
या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला आणि संबंधित संशयित आरोपी यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगच्या क्लिप पीडित महिलेच्या पतीला पाठवण्यात आल्या. त्यातील संभाषण व्हायरल होईल, या कॉलमुळे आपली समाजात बदनामी होईल, या भीतीने पीडित महिलेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, लैंगिक अत्याचार, विनयभंग या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर हे करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!