Just another WordPress site

भीषण वास्तव! शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच; गेल्या ६ महिन्यात धुळे जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी स्वत:ला फासावर लटकलं

धुळे : राज्य शेतकरी आत्महत्यामुक्‍त करू असा दावा राज्य सरकारकडून केला जात असतानाच धुळे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात तब्बल ३२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. पिकांचं होणारं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जून ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सत्तांतरानंतर भाजप व शिंदे गटाची सत्ता आली. राज्याचा कारभार हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्यामुक्‍त करू, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात आत्महत्या नियंत्रणासाठी कोणत्याच भरीव उपाययोजनांवर भर दिला गेला नाही. परिणामी, आत्महत्यांची धग कायम आहे.एकट्या धुळे जिल्ह्यात ३२ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. मात्र आर्थिक मदतीसाठी केवळ दोन प्रस्ताव पात्र ठरले असून दहा प्रस्ताव पात्र तर २० प्रस्ताव प्रलंबीत असून त्यांची चौकशी सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेले कापूस, मका, सोयाबीन यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची अद्याप शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच डोक्यावर असलेले कर्ज यातून जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यात आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील सर्वाधिक १४ शेतकऱ्यांचा समावेश असून धुळे तालुक्यातील बारा तर शिरपूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. जून आणि सप्टेंबर या महिन्यात प्रत्येकी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर जुलै महिन्यात पाच, ऑगस्टमध्ये सहा, ऑक्टोबर महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे., जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून देखील आर्थिक मदतीसाठी केवळ दोन प्रस्ताव पात्र ठरले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाचं संकट होतं. त्या तणावातून शेतकरी जात असताना या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. पिकाची स्थितीही चांगली होती. मात्र, परतीच्या पावसानं घात केला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळं आता शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यातून शेतकरी टोकाचं पाऊस उचलत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!