Just another WordPress site

शेलार-ठाकरे भेटीमुळे नवे राजकीय संकेत; महायुतीला मनसे आपले इंजिन जोडणार!

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सोमवारी सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर मनसे आणि महायुतीमध्ये (Mahayuti) हातमिळवणी करण्याबाबत खलबते झाल्याची आणि दिल्लीतील पक्षनेतृत्वाचा निवडणुकीसंदर्भात निरोप घेऊन आल्याची चर्चा रंगली आहे.

कॉ. पानसरे स्मारकाचे आज लोकार्पण, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार डी. राजा यांची उपस्थिती 

भेटीबाबत राज यांना विचारले असता त्यांनी आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या वेळी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले. तर आशिष शेलार यांनी ही राजकीय नव्हे तर व्यक्तिगत भेट असल्याचे सांगितले. दोन राजकीय नेत्यांत भेटीगाठी होत असतात. राज तर माझे मित्र आहेत, त्यामुळे आम्ही भेटत असतो. त्यामुळे या भेटीला राजकीय साद घालायला गेलो वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. पण अशा भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असेही म्हणता येत नाही. या भेटीबाबत योग्य वेळी खुलासा केला जाईल, असे शेलार म्हणाले.

ईव्हीएम बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

सध्या मनसेसोबत युती होईल अथवा न होईल, पण त्यांच्यासोबत काही हातमिळवणी करता येईल का? याची चाचपणी भाजप व शिंदे गटाकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. मनसेला सोबत घेण्यासोबत किंवा एकमेकांत समन्वय ठेवण्यासाठी महायुतीकडून गेल्या काही महिन्यांत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मनसे आणि भाजप नेते व शिंदेंच्या वारंवार गाठीभेटी होत आहेत. त्यामुळेच महायुतीला मनसेचे इंजिन जोडणार का, याची चर्चा रंगताना दिसत आहे. एकत्र येण्याला मनसेची उत्तर भारतीयांबाबतची पूर्वीची भूमिका अडचणीची ठरू शकेल, अशी भीती भाजपच्या नेतृत्वाला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज यांना सोबत घेण्यास उत्सुक आहेत. पण भाजपच्या होकाराशिवाय मनसेला महायुतीत सामील करणे अशक्य आहे. त्यामुळे मनसे व भाजप नेत्यांत वारंवार बैठकांचा सपाटा आहे.

राज ठाकरे यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या काही अटी मान्य केल्यास युती होऊ शकते, असे बोलले जाते. त्यासाठी राज ठाकरे भाजप पक्षनेतृत्वाला भेटण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील शहरी भागात ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांत विभागणी करण्याबाबत रणनीती आखली जाऊ शकते, याची चर्चा आहे. त्यामुळे राज आणि शेलार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!