Just another WordPress site

तुम्ही शेळीपालन करत आहात? मग शेळ्यांच्या खाद्यामध्ये करा ‘या’ झाडपाल्यांचा समावेश

आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. मात्र, आता शेतीतून मिळणारे उत्पादन यासाठी लागणारा खर्च, वातावरणातील बदल आणि मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचं झालं. त्यामुळं केवळ शेती या मुख्य व्यवसयावर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत नाही. त्याला जोड व्यवसाय हा काळाची गरजच झाला. बहुतांश शेतकरी जोडधंदा म्हणून शेळी पालन करतात. शेळीपाळणातून अर्थाजन करण्यासाठी शेळ्यांना योग्य चारा योग्य वेळी देणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शेळ्यांसाठी कोणता झाडपाला पोषक राहणार आहे याच विषयी जाणून घेऊ.
शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी, प्रजननासाठी खनिजे, जीवनसत्त्वे आणि काही महत्त्वाच्या अन्नघटकांची गरज असते. या घटकांचा समतोल योग्य प्रमाणात राखला नाही, तर शेळ्यांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळून येतात. त्यामुळं शेळ्यांच्या आहारात महत्वाचा असतो तो हिरवा चारा. मात्र, बारमाही हिरवा चारा मिळणे तसे अशक्यच. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडापाल्याचा आधार घ्यावा लागतो. शेळ्या झाडपाला खुप आवडीने खातात. झाडाच्या पाल्यामध्ये खनिजांचे आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने शेळीला आवश्यक ती पोषणमुल्ये सहज मिळतात.

 

बाभूळ

बाभूळ ही सहज शेतावरच्या बांधावर आढळून येते. मात्र, शेळ्यांचा आहारात हिला अधिकचे महत्व आहे. या बाभळीचे दोन प्रकार असतात. यामध्ये छत्रीसारखी सावली देणारी आणि सरळ रेषेत वाढणारी बाभूळ, रामकाठी हे बाभळीचे झाड साधारणत: १५ ते १६ मीटर ऊंच वाढते याच झाडाचा पाला शेळ्या आवडीने खातात.

 

सुबाभूळ

सुबाभळीचा वापर गुरांना चारा म्हणूनही केला जातो. मात्र, या बाभळीच्या झाडांच्या पानामध्ये मायमोसीन विषारी द्रव्य असल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त आणि सतत हा पाला शेळ्यांना खाऊ घातल्यास त्यांच्या अंगावरील केस गळून पडतात व त्यांची वाढ खुंटते. म्हणून शेळ्यांच्या एकूण आहाराच्या २० ते २५ टक्केच पर्यंतच सुबाभळीच्या पाल्याचा उपयोग करावा.

 

खैर

खैराची झाडे डोंगर उतारावर, शेताच्या बांधावर आढळतात. सदैव हिरवेगार असणारे हे झाड सर्वसाधारणपणे १५ ते १६ मीटर उंच वाढते. याचा पाला शेळ्या आवडीने खातात.

 

शेवगा

शेवग्याचा पाला शेळ्यांना फार आवडतो. या पाल्यात शुष्क तत्वावर प्रथिने १५ टक्के, पचनीय प्रथिने १० तर एकूण पचनीय अन्नघटक ६० टके आढळतात. तर हादगा हे मध्यम आकाराचे झाड असून शेंगा आणि पाने शेळ्यांना खाद्य म्हणून वापरता येतात. शेवग्याच्या पानामध्ये ५ ते ७ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

 

गिरीपुष्प

गिरीपुष्प हा मध्यम उंचीचा वृक्ष असून त्यामध्ये क्षारांचे प्रमाण चांगले असते. ह्याचा पाला किंचित सुकवून शेळ्यांच्या आहारात वापरता येतो. यामुळे शेळ्यांची वाढ तर होतेच पण हा पोषक आहार असल्याने त्याचे वेगळे महत्व आहे.

 

चिंच

चिंचेचे झाड तर आपणा सर्वाना माहित असेलच, जास्त उष्णतेच्या भागात, तग धरून राहणारे हे झाड आहे. चिंचेची आंबट पाने शेळ्या मोठ्या आवडीने खातात.

 

अंजन

अंजनाची झाडे सर्वत्र आढळून येतात. विविध प्रकारच्या मातीत अंजनाची वाढ चांगली होते. शेळ्यांसाठी या झाडाचा पाला उत्कृष्ट असतो. कमी पाण्यावर तग धरून अंजनाची वाढ चांगली होते.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!