Just another WordPress site

पशुपालकांना मोठा दिलासा! लम्पीमुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात लम्पी आजाराने आतापर्यंत चार हजार जनावरे दगावली असून या मृत जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसाहाय्य देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा राज्य सरकारने बुधवारी केली. त्यानुसार मृत पडलेल्या दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये आणि वासरांच्या पशुपालकांना १६ हजार रुपये साहाय्य देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात काही दिवसांपासून लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. सोमवारपर्यंत जवळपास चार हजार जनावरे दगावल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे जाहीर करण्यात आली. या प्रश्नावरून विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही यासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने पशुपालकांना आर्थिक साहाय्य देण्याची मागणी करण्यात आली. अखेर राज्य सरकारने बुधवारी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, ४ ऑगस्टपासून लम्पीमुळे दगावलेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना ही मदत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथिल करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी यासंदर्भात सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्याचेही निर्णयात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!