Just another WordPress site

तब्बल ५ वेळा नामांकन होऊनही महात्मा गांधींजींना शांतीचा नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? नेमकं कारण तरी काय?

फ्रान्समधील १९४० च्या दशकातील कष्टकरी स्त्रियांच्या अनुभवविश्वाचे निर्भीडपणे दर्शन घडविणाऱ्या ८२ वर्षीय फ्रेंच लेखिका ॲनी अर्नो यांना यंदाचे साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. तर काही दिवसांपूर्वी भौतिकशास्त्र विषयात योगदान देणाऱ्यांना नोबेल जाहिर झाले. खरंतर साहित्य, समाजकार्य, विज्ञान या क्षेत्रा बरोबर शांततेसाठीही नोबेल पुरस्कार देण्यात येतो. आजवर ज्यांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन शांततेसाठी कार्य केले त्यांना नोबेल दिला गेला. मात्र, गांधीजींना नोबेल मिळाला नाही. दरम्यान, गांधीजींना नोबेल का मिळाला नाही, याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. ॲनी अर्नो यांना यंदाचे साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर
२. गांधींजी हे २० व्या शतकातील अहिंसेचे मोठे प्रतीक
३. गांधींजींचे ५ वेळा शांततेच्या नोबेलसाठी झाले होते नामांकन
४. गांधीजींना पुरस्कार न देणे ही चुक – नोबेल समिती

 

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचींचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात शांतता टिकून रहावी, यासाठी गांधीजी यांनी सातत्याने प्रयत्न केले. गांधी यांच्या याच विचारांचा प्रभाव मार्टीन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला यासह जगातील अनेक नेते मंडळींवर पडला. महात्मा गांधी हे २० व्या शतकातील अहिंसेचे सर्वात मोठे प्रतीक होते. या कारणांमुळेच गांधींजींचे तब्बल ५ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले होते. गांधींजींचे १९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि १८४८ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. यात पहिल्यांदा नॉर्वेच्या ओले कोल्बजॉर्नसन या खासदाराने गांधींच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता. कोल्बजॉर्नसन हे नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य होते. याच समितीचे सदस्य असलेले जेकब वॉर्म मूलर यांच्या गांधीजींच्या बाबतीत असलेले नकारात्मक विचार आणि भूमिकेमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. मुलर यांनी महात्मा गांधींचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या व्यक्तित्वावर विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितलं होतं. गांधींच्या महानतेवर कोणतीही शंका नाही. ते प्रसिद्ध आणि सन्मानिय आहेत. ते आदर्श व्यक्तिमत्व असले तरी अनेकदा ते सर्वसामान्य राजकारण्यासारखे वागतात, असं मत मुलर यांनी १९३७ ला नोंदवले होते. याशिवाय त्यांनी अनेक धक्कादायक अशी निरीक्षणे मांडली होती. त्यांच्या मतानुसार, गांधी हे पूर्णत शांततेचे उपासक नव्हते. त्यांना इंग्रजांविरुद्धच्या अहिंसेच्या मार्गाने चालणारे आंदोलन कधीही हिंसक वळण घेऊ शकेल याची काळजी नव्हती असेही मुलर यांनी सांगितले होते. इतकंच काय पण गांधीजींची भूमिका भारतीयांपुरतीच मर्यादीत होती. त्यांचे दक्षिण आफ्रीकेतील आंदोलनही भारतीय लोकांच्या हितांपुरतेच होते. तिथल्या कृष्णवर्णीयांसाठी काहीच केले नाही, असं मुलर यांचं मत होतं.

मुलर यांच्या विचारांना त्यांचे स्वत:चे दुर्भाग्य म्हटले पाहिजे कारण जर मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर या कामाची प्रेरणा गांधीजी असल्याचे सांगितलं होतं. दरम्यान, पुढं १९३८ आणि १९३९ साली कोल्बजॉर्नसन यांनी पुन्हा शांतीच्या नोबेलसाठी गांधींचे नाव सूचवले, मात्र समितीने त्या वर्षी गांधींचे नाव शॉर्टलिस्टच केले नसल्याचे समोर आले. त्यानंतर १९४७ साली भारतातून गांधींचे नाव गोविंद वल्लभ पंत, गणेश मावळणकर यांच्याकडून नोबेल पुरस्कारासाठी सूचवले गेले होते. “समितीच्या काही सदस्यांकडून या बाबतीत सकारात्मकता आहे. पण सर्व सदस्यांची याला मान्यता नाही. पाकिस्तानशी संबंध बिघडल्यानंतर गांधीजी म्हणाले की, मी युद्धाच्या विरोधात आहे. पण पाकिस्तानच्या हट्टी वागण्यामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे भारताला युद्ध करावं लागेल.” गांधींनी केलेले हे विधान हे युद्धाचे समर्थन करणारे आहे, असे मानण्यात आलं. त्यामुळे १९४७ साली देखील त्यांना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला.

१९४७ नंतर पुढच्याच वर्षी गांधीजींच्या नावाचा प्रस्ताव नोबेल पुरसकारासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने नामांकनासाठी अर्ज करण्याच्या दोन दिवस अगोदर गांधीजींची हत्या झाली. तसेच तोपर्यंत कोणालाही नोबेल पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत जरी दिला गेला असता तरी त्या पुरस्काराची रक्कम कोणाला द्यायची असा प्रश्न समितीसमोर होता. गांधीजींची कोणतीही संघटना, संस्था किंवा ट्रस्ट नव्हते. शेवटी १९४८चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणालाही देण्यात आला नाही. १९८९ ला जेव्हा दलाई लामांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला तेव्हा समितीने गांधीजींना पुरस्कार न देणे ही चुक असल्याचे मान्य केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!