Just another WordPress site

घरात कॉंग्रेसचा राजकीय वारसा असतांनाही मनेका गांधींनी BJP शी हातमिळवणी का केली? का सोडलं इंदिराजींच घर?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता पंजाब राज्यात होशियारपूर येथे दाखल झालीये. यावेळी राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य केलं. ‘मी वरूण यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण माझी विचारधारा त्यांच्या विचारधारेशी जुळत नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. त्यामुळं चर्चा सुरू झाली ती मनेका गांधी यांचीही. गांधी घराण्यापासून मनेका गांधी यांनी फारकत घेतली होती. सासरचा राजकीय वारसा असतांनाही त्यांनी त्यांनी भाजपशी हातमिळवणी का केली? याच विषयी जाणून घेऊ.

खरंतर प्रत्येक कुटुंबाचे आपले काही वाद असतात. आणि जर कुटुंब हाय प्रोफाइल राजकारणी असेल तर पूर्ण जगाला चार भिंतींआड काय चाललंय याची उत्सुकता लागलेली असते. असंच एक घराणं म्हणजे, गांधी घराणं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, त्यांच्या घरातले वाद राजकीय चर्चेचा विषय झाले होते. राजकीय वारश्यावरून गांधी परिवारात सतत तणाव होताच. पण संजय गांधींच्या मृत्यूनंतर तो शिगेला पोहोचला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, सोनिया गांधी या राजकारणापासून लांब राहणंच पसंत करत. तर मनेका गांधी राजकारणात शिरण्याची संधी शोधत. मात्र, मनेका गांधी फटकळ असल्यानं इंदिरा गांधी त्यांना राजकारणापासून लांबच ठेवत. त्या दरम्यान, राजीव गांधी राजकारणात विशेष रुची घेऊन, शांत राहून आपल्या आईला मदत करत होते. त्यामुळं आपला उत्तराधिकारी राजीव गांधींचं असतील असं त्यांनी ठरवलं होतं.

त्या काळी दिल्लीत सूर्या नावाचा अंक फार प्रसिद्ध होता. त्या अंकातून इंदिराजींच्या १९७७ च्या पंतप्रधान निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांच्यावर ताशेरे ओढले जात होते. मनेका गांधींना ही गोष्ट पटत नव्हती. त्यांनी स्वतःहून इंदिरा गांधींकडून त्या अंकाला उत्तर देण्याची जबाबदारी मागून घेतली होती आणि आपलं पूर्ण लक्ष त्यांनी त्यावरच केंद्रित केलं होतं. पण तरीही घरातले वाद विवाद काही कमी होत नव्हते. आपणही इंदिराजींना इतक्या महत्वाच्या कामात मदत करतो, तरीही आपल्याला घरात काहीच किंमत नाही, ह्याचं त्यांना दुःख होतं. पुढं १९८० च्या दशकात इंदिरा गांधी या पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. ज्यानंतर त्यांचं सगळं कुटुंब १ सफरदरजंग रोड या ठिकाणी असलेल्या पंतप्रधान निवासस्थानात वास्तव्यास गेलं. मात्र त्याच वर्षी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हा मनेका गांधी या २५ वर्षांच्या होत्या. मनेका यांना सावरण्यासाठी इंदिराजींनी मनेका यांना त्यांची सेक्रेटरी करण्याच ठरवलं. मनेकादेखील तयार झाल्या. पण सोनियाजींचा मात्र या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांना मनेका, त्यांच्या तिखट बोलण्यामुळे राजकारणात शिरायला नको होत्या. इतकंच नाही, तर त्यांना राजीव गांधींचं सुद्धा राजकारणात जाणं मान्य नव्हतं. ह्यासाठी त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून आपलं मत कळवलं. त्यामुळं इंदिरांजींना आपला निर्णय मागे घेतला. या गोष्टीचं मनेका गांधींना फार वाईट वाटलं. संजय गांधी यांच्याकडे असलेला वारसा हा राजीव गांधींकडे गेला. त्यामुळे इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले.

स्पॅनिश लेखक जेवियर मोरो यांनी The Red Sari नावाचं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला की राजीव गांधी यांना इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या पुढे घेऊन चालल्या होत्या. ही गोष्ट मनेका गांधी यांना मुळीच पटली नाही. इंदिरा गांधी यांच्यापाशी त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली. यानंतर इंदिरा गांधी विदेश दौऱ्यावर गेल्या असताना मेनका गांधी यांनी आपल्या समर्थकांसह एक सभा घेतली. २८ मार्च १९८२ च्या सकाळी इंदिरा गांधी या लंडनचा दौरा संपवून परत आल्या. त्यावेळी ही वार्ता इंदिराजींच्या कानावर गेली. मनेका गांधी यांची हे कृती त्यांना आवडली नाही. आणि त्यांनी थेट मनेका गांधींना लगेच घर सोडायला सांगितलं. तू आत्ता या घरातून बाहेर निघ. तुझ्या ज्या वस्तू, कपडे, बॅग्ज आणि इतर सामान आहे ते तुला पाठवलं जाईल, असं मनेका यांना इंदिरा गांधींना ठणकावलं. आणि दोन वर्षांच्या वरूण गांधी यांना घेऊन मनेका गांधींनी इंदिरा गांधींचं निवासस्थान सोडलं. त्या कारमध्ये बसल्या.. आणि रवाना झाल्या. हा सगळा घटनाक्रम कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेरांमध्ये कैद केला. पुढे मनेका गांधींनी संजय विचार मंचाची स्थापना केली. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत मनेका गांधी यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्या ही निवडणूक हरल्या. यानंतर त्या जनता दलात सहभागी झाल्या. १९८९ मध्ये जनता दलाने त्यांना पीलीभीतमधून तिकिट दिलं. त्यावेळी त्या खासदार झाल्या. पुढं २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून त्या भाजपच्या खासदार आहेत. तर वरूण गांधीही भाजपच्याच तिकीटावर खासदार आहेत.

आता गेल्या काही दिवसांपासून वरूण गांधी हे भाजपात नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्यात. ते अनेकदा जाहीरपणे आपल्याच पक्षावर टीका करताना दिसून येताहेत. मागील २ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी काही मासिकांमध्ये लेख लिहून ज्या प्रकारची वेगळी भूमिका घेतली, त्यामुळं वरून गांधी काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली. आगामी काळात वरुण गांधींनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यास केवळ वरुण गांधींनाच नव्हे, तर काँग्रेसलाही याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सारखं महत्त्वाचे राज्य, पंतप्रधान बनण्याचा मार्ग उत्तर प्रदेशामधून जातो, असं बोलल्या जातं, तिथे पक्ष वरुण गांधींचा वापर करू शकतो. एक धडाकेबाज आणि तरुण चेहरा म्हणून वरुण गांधी यूपीमध्ये काँग्रेसला पुढे नेऊ शकतो आणि यामुळे या राज्यात काँग्रेसचा काही अंशी स्थिती सुधारू शकते. मात्र राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!