Just another WordPress site

सत्यजित यांच्या आधी मामा बाळासाहेब थोरात, वडील सुधीर तांबेंनीही लढवली अपक्ष निवडणूक, काय आहे किस्सा?

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. कॉंग्रेसने उमेदवारी दिलेली असताना डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र प्रेमापोटी अखेरच्या क्षणी उमेदवारी दाखल न करता निवडणुकीतून माघार घेतली. या निवडणुकीत तांबे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान फक्त सत्यजित तांबे यांनीच नाही तर या अगोदर काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि त्यानंतर नंतर वडील सुधीर तांबे यांनीही अपक्ष निवडणूक लढून आपली योग्यता सिद्ध केली होती. नेमका काय होता तो किस्सा? याच विषयी जाणून घेऊ.

आता सत्यजित तांबे नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष लढवत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे भाजप आणि आघाडीच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. सत्यजित यांनी अपक्ष निवडणूक लढवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केलीये. मामा बाळासाहेब थोरात आणि वडील डॉ. सुधीर तांबे यांच्या पावलावर पाऊल टाकत सत्यजित तांबे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाताहेत.

सन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये होते. तत्कालीन निवडणुकीत भाऊसाहेब थोरात आणि मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चांगलाच संघर्ष झाला. दोघांनाही दुखावणं काँग्रेसश्रेष्ठींना अवघड होतं. शेवटी खताळ आणि भाऊसाहेब थोरात या दोघांनाही आमदारकीचे तिकीट काँग्रेसनं नाकारलं. आणि पुण्यातील शकुंतला थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, भाऊसाहेब थोरात माघारी फिरायला तयार नव्हते. शिवाय आपल्याच पक्षाविरोधात बंड करणंही त्यांच्या मनाला पटत नव्हतं. म्हणून तेव्हा त्यांनी आपले चिरंजीव बाळासाहेब यांना अपक्ष उभं केलं. आणि बाळासाहेब थोरात या निवडणूकीत विजयी झाले होते. त्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागली आणि आजवर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आठ वेळा निवडून आलेत.
तोच प्रसंग पुन्हा बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आणि सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे यांच्या बाबतीतही घडला. २००९ मध्ये भाजपचे प्रतापदादा सोनवणे लोकसभेवर निवडून गेल्याने, त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अॅड. नितीन ठाकरेंना, तर भाजपने प्रसाद हिरेंना उमेदवारी दिली होती. तेव्हा डॉ. सुधीर तांबे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. थोरातांनी प्रचंड प्रयत्नही केले, पण काँग्रेसकडून सुधीर तांबेना उमेदवारी मिळाली नाही. तिकीट न मिळाल्याने सुधीर तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि तिरंगी लढतीत अपक्ष असलेल्या सुधीर तांबेंनी बाजी मारली. त्यानंतरच्या दोन निवडणूका त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढल्या आणी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.
आता पुन्हा तीच वेळ बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यावर आलीये. गेल्या २२ वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सत्यजित तांबेंना उपेक्षाच वाट्याला आलीय. आपल्या मुलाच्या राजकीय भविष्यासाठी सुधीर तांबे यांनी बंड करत सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क, मनमिळाऊ व्यक्तीमत्व यामुळे कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार होऊ शकतात, अशी शक्यता बोलल्या जातेय.
दरम्यान, निवडणुकीच्या निकालापर्यंत आणि निकालानंतरही या घडामोडी काय वळणं घेतात आणि सत्यजित तांबेंचा अंतिम थांबा पुन्हा ‘काँग्रेस’च असेल की ‘भाजप’ असेल, हे पाहणं आता येणारा काळच ठरवेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!