Just another WordPress site

इराणमधील महिलांवरील अन्यायाला जगभर वाचा फोडण्याचं काम करणाऱ्या मसीह अलीनेजाद कोण आहेत?

इराणमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोल सुरू आहे. अमिनी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर इराणी महिलांमध्ये मोठा संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी केले. दरम्यान, मसीह अलीनेजाद आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घ्या.

 

महत्वाच्या बाबी

१. इराणमधील महिलांची स्थिती दिवसेंदिवस फारच वाईट
२. इराणमध्ये महसा या तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू
३. मसीह अलीनेजाद या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या
४. अलीनेजाद इराणमधील हिजाब कायद्याविरोधात लढताहेत

 

अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांसाठी कडक कायदे असून या कायद्यांमुळं महिलांना अधिक बंधनात राहावं लागतं. या कायद्यांना महिलांचा विरोध असतो. कधी तो व्यक्त होतो, तर कधी अव्यक्तच राहतो. मात्र बंधनात राहायला कुणालाच आवडत नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. इराणमधील महिलांची स्थिती दिवसेंदिवस फारच वाईट होत चालली. मोठ्या संख्येनं महिलांना निर्बंध आणि अत्याचारांना सामोरं जावं लागतंय. यालाच आता महिलांनी खुलेपणानं विरोध सुरू केलाय. सोशल मीडियाचा आधार घेत महिलांनी आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अलीनेजाद या इराणमधील हिजाब कायद्याविरोधात लढा देत आहेत.
आंदोलनात त्यांचा थेट सहभाग नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणी महिलांचा आवाज जगभर पोहोचवण्यात त्यांचा मोठा हात आहे. त्या माजी पत्रकार असून कट्टरपंथीय विरूद्ध कॅम्पेन चालवतात. पत्रकार असतांना त्यांची सरकारच्या धोरणांवर तुटून पडणारी अशी ओळख होती. उत्तर इराणच्या मझंदरान प्रांतातील गोमिकोला गावात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इराणमधील रुढी-परंपरांना त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्यांनी नेहमीच इराणी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांना हिजाबविरोधी आंदोलनासाठी पहिल्यांदा अटक झाली १९९४ मध्ये. तेव्हा त्यांच वय १८ वर्ष होतं. तेव्हा त्यांनी इराणी कट्टरतावादी राजवटीविरोधात पत्रकं वाटली होती. याप्रकरणी अनेक आठवडे अलीनेजाद यांची चौकशी करण्यात आली. पाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. वयाच्या विसाव्या वर्षी विवाह केल्यानंतर काही वर्षातच अलीनेजाद यांचा घटस्फोट झाला. इराणी कायद्यांमुळे त्यांना त्यांच्या मुलाचा ताबा गमवावा लागला.
२०१४ रोजी अलीनेजाद यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोतील वाऱ्याच्या वेगाने उडणारी अलीनेजाद यांचे केस पाहून त्या उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याचा हेवा वाटतो, अशी प्रतिक्रिया इराणी महिलांनी दिली होती. त्यानंतर अलीनेजाद यांनी अशाच प्रकारची छायाचित्र पोस्ट करण्याचे आवाहन इराणी महिलांना केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर ‘माय स्टेल्थी फ्रिडम’ ही मोहीम सुरू झाली. अलीनेजाद यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानानंतर इराणमधील महिलांचा आवाज त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमधून जगभर पोहोचू लागला. दरम्यान, अलीनेजाद यांच्या ‘लेट अस टॉक’ या सोशल मीडिया अभियानातून इराणी आणि अफगाणिस्तानातील महिलांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले. २००९ पासून त्यांचं इराणमध्ये राहणंच मुश्कील झालं. त्यामुळं त्यांनी २००९ मध्ये देश सोडून अमेरिकेचा आसरा घेतला. २०१९ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्वही मिळालं. सध्या त्या बाहेर राहून आपल्या ब्लॉगद्वारे महिलांच्या स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय आणि इतरांवर होत असलेल्या शोषणाबाबतचे मुद्दे उठवत असतात.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!