Just another WordPress site

फिजिकल सिमकार्डऐवजी येणार ई-सिम कार्ड, ई-सिम म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय?

ॲपलने आयफोनची नवी आवृत्ती अर्थात आयफोन १४ ची घोषणा करताना त्यातून सिम कार्ड हद्दपार केल्याचे जाहीर केले. त्याऐवजी या आयफोनमध्ये आठ ‘ई सिम’ चालू ठेवण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं. दरम्यान, या ई-सिम विषयी अनेकांना कुतूहल आहे. याच निमित्ताने ई-सिम म्हणजे काय, ते कसे काम करते? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. आता फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय!
२. अदृष्य सिमकार्डाने स्मार्टफोन चालवू शकाल
३. ई-सिम सुविधा ही तशी दहा वर्षे जुनी संकल्पना
४. ही सुविधा काही निवडक स्मार्टफोनसाठीच उपलब्ध

 

आता अदृष्य सिमकार्डाने तुम्ही तुमचा स्मार्टफोन चालवू शकाल असं कोणी सांगितलं तर त्याला वेड्यात काढलं जाईल. मात्र हे खरं आहे. आता खरोखरीच एक अशी सुविधा मिळण्यास सुरुवात झाली. दूरसंचार आणि तंत्रज्ञान उद्योगात सध्या ई-सिमची मोठी चर्चा आहे. टेक कंपनी Apple नं काही दिवसांपूर्वी iPhone 14 सीरीज लाँच केली होती. या आयफोन १४ मध्ये कोणतेही फिजिकल सिम नसल्याची बातमी आहे. कंपनीने फक्त ई-सिमचा पर्याय दिला आहे. मात्र, ई-सिम ही संकल्पना नवीन नाही. आतापर्यंत अनेक फोनमध्ये हे फीचर आले आहे. मात्र, सध्या ही सेवा फक्त त्या फोनमध्ये उपलब्ध आहे ज्यात किमान एक फिजिकल सिम आहे. म्हणजेच, ड्युअल सिम फोन ज्यामध्ये किमान एक फिजिकल सिम दिले गेले आहे. दुसरीकडे, फिजिकल सिमची प्रणाली आयफोनद्वारे काढून टाकली जात आहे.

 

ई-सिम म्हणजे काय?

ई सिमच्या नावावरूनच कळतं की हे एक वर्चुअल सिम आहे. या सिमला आपण डोळ्यानी पाहू शकत नाही. कारण ते हार्डवेअर किंवा मदरबोर्डवर बसवलेले असते. ई-सिम हा एम्बेडेड सिम या शब्दाचा संक्षेप आहे. प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी डिजिटली जतन करून मोबाइल सेवा वापरण्याची सुविधा ई-सिम देते. यात प्लास्टिकचे सिम कार्ड बसवण्यासाठी जागा दिलेली नसते. मोबाइलच्या हार्डवेअरमध्येच सिम कार्डच्या चिपचा अंतर्भाव करण्यात आलेला असतो. कोणत्याही मोबाइल सेवापुरवठादाराची सेवा घेऊन या चिपद्वारे ई-सिम कार्यान्वित करण्यात येते. तसेच मोबाइल सेवा बदलायची झाल्यास नवीन सिम कार्ड बसवण्याच्या खटपटीत न पडता चिप ‘रिप्रोग्राम’ करून सेवा सक्रिय करता येते.

 

आयफोन १४च्या ई-सिम सेवेचे काय?

ॲपलने आयफोन १४च्या अमेरिकेतील आवृत्तीतून सिम कार्डची जागा हद्दपार करण्याचे जाहीर केले. त्याऐवजी आयफोन १४मध्ये आठ ई-सिम प्रोफाइल कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ युजर्सला एका आयफोनवरून आठ क्रमांक हाताळण्याची सोय असेल. अर्थात एका वेळी केवळ दोनच ई-सिम त्याला सक्रिय ठेवता येतील.

 

ई-सिमचे काय आहेत फायदे?

जे लोक सतत सिम कार्ड बदलत नाहीत त्यांच्यासाठी eSIM हे खूप फायदेशीर ठरते. हे सिम एकदा का तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाकले तर तुम्ही मग बिनधास्त होऊन जाऊ शकता. या ई-सिममध्ये अनेक प्रोफाईल सेव्ह केले जाऊ शकतात, तसेच याचा आणखी एक फायदा म्हणजे आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलो तर ते आपोआप शहरानुसार प्रोफाइल बदलू शकते. दुसरं म्हणजे, ई-सिम मोबाइल सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. तुम्ही जर का तुमच्या स्मार्टफोनमध्ये eSIM चा वापर केला असेल आणि जर तो फोन हरवला तर त्याचा डेटा लॉक उघडल्याशिवाय सहज काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन हा सहजपणे ट्रैक करू शकतो.

 

ई-सिमचे नुकसान काय आहे?

ई-सिम ही आकर्षक संकल्पना असली तरी, तिचे काही धोके आहेत. समजा एखाद्या वेळेला जर तुमचा स्मार्टफोन अचानक बंद पडला, तर तुम्हाला त्या मोबाईल मधले eSIMs सिम काढून इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये टाकता येणार नाही. आपल्या साध्या सिमकार्ड एक फायदा असा की , फोन खराब झाल्यास, तुम्ही ते सिम काढून सहजपणे दुसऱ्या फोनमध्ये टाकू शकता.

 

सिम कार्ड पूर्णपणे हद्दपार होतील का?

ई-सिम सुविधा ही तशी दहा वर्षे जुनी आहे. मात्र, अजूनही ती प्रचलित झालेली नाही. अद्याप ही सुविधा काही निवडक आणि उच्च किंमत श्रेणीतील स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे. कारण, हे तंत्रज्ञान अद्याप कमी किमतीतील स्मार्टफोनच्या मदरबोर्डशी संलग्न करण्यात आलेले नाही. परिणामी सिमकार्ड पूर्णपणे हद्दपार होऊन ई-सिम पूर्णपणे त्याची जागा घेण्याची परिस्थिती येण्यास आणखी काही वर्षे जावी लागतील.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!