Just another WordPress site

एटीएममधून फाटलेली किंवा खराब झालेली नोट मिळाल्यास काय कराल? फाटलेली नोट कशी आणि कुठे बदलून मिळते?

बाजारात भाजी घेताना किंवा एखाद्यावेळी घाईघाईत टॅक्सी चालकाला पैसे दिल्यानंतर ते आपल्याला उरलेले पैसे परत देतात. आणि ते पैसे न बघता आपण खिशात ठेवून घेतो. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या ठिकाणी आपण ते पैसे खर्च करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की, आपण जे पैसे न बघता ठेवलेत त्यातील एक नोट फाटलेली आहे. अशातच मग अनेकदा आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. आता ह्या फाटलेल्या नोटेचं नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न अनेकदा आपल्यासमोर उभा राहतो. दरम्यान, फाटलेल्या नोटांचा करायचं काय? याच विषयी जाणून घेऊ.

तुम्हांलाही जर कुणी फाटलेली किंवा खराब झालेली नोट दिली असेल, किंवा घाईघाईत ती तुम्हांला मिळाली असेल तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. अशा फाटलेल्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलुन घेऊ शकतो. मात्र त्यासाठी ह्या नोटांवर त्या नोटेला जारी करणारी संस्था, गॅरंटी, प्रॉमिस क्लॉज, गव्हर्नरची सही, अशोक स्तंभ किंवा महात्मा गांधींचा फोटो आणि वॉटर मार्क असणे आवश्यक आहे.

आरबीआयच्या नियमांनुसार बदलून मिळतात फाटलेल्या नोटा

अनेक ठिकाणी काही दुकानांत अशा फाटलेल्या आणि जुन्या नोटा बदलून दिल्या जातात. पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात १०० ते २०० रुपये आपल्याला द्यावे लागतात. पण हीच नोट जर आपण बॅंकेत घेऊन गेलो तर तुम्हांला तिथं काही मोबदला मागितला जात नाही. सरकारने सार्वजनिक बँकेत अशी फाटलेली नोट बदलून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे…खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा ज्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व नंबर असतील अशी नोट सार्वजनिक बँकेच्या काउंटरवर, काही खासगी करन्सी चेस्ट काउंटरवर तसेच आरबीआयच्या रिजनल ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म न भरता बदलून मिळु शकतात.

जुन्या-फाटलेल्या नोटांना बदलण्याची तरतूद

अगदी जरी एका नोटचे अनेक तुकडे झाले, तरी ते बँकेत बदलून मिळू शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी बँक ती नोट बदलून देऊ शकते. मात्र जर नोटा पूर्णपणे फाटलेल्या आहेत, पूर्णपणे कापल्या किंवा जळालेल्या आहेत तर, त्या फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये बदलता येऊ शकतात.
आरबीआयने आपल्या ह्या तरतुदीत असे लिहिले आहे की,“फाटलेल्या-खराब नोटा म्हणजे अशा नोटा ज्यांचा एक भाग नसेल किंवा ती दोन पेक्षा जास्त तुकड्यांनी जोडून बनविली गेली असेल.” आरबीआयने नोट वापसी नियमावली २००९ नुसार जर कुठीलीही एक रुपयाची, दोन रुपयाची, पाच रुपयाची, दहा रुपयाची आणि वीस रुपयाची नोट ही ५० टक्क्यापेक्षा कमी फाटलेली असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत मिळतील. बँक तुम्हाला त्याचा पूर्ण मोबदला देईल. पण जर ह्या नोटा ५० टक्क्यापेक्षा अधिक खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर बँक तुम्हाला त्याच्या मोबदल्यात एकही रुपया देणार नाही. तसेच ५० रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या नोटांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. जर ५० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची नोट ही त्या नोटेच्या वास्तविक आकाराच्या ६५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तरच त्याचे पूर्ण पैसे परत मिळतील. जर ह्या नोटेचा आकार हा वास्तविक आकाराच्या तुलनेत ४० टक्क्यापेक्षा जास्त आणि ६५ टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्या नोटेच्या किमतीच्या अर्धे पैसे बँक तुम्हाला देईल. जर तुमच्याकडे कधी अशी एखादी नोट आली ज्यावर लिहिलेलं आहे, तर तुम्हाला बँक नोटेच्या बदल्यात नवी नोट परत तर नाही करणार पण ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. ह्या खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात जो मोबदला दिला जातो तो शिक्के आणि १० रुपयांच्या नोटांच्या रुपात दिला जातो.

तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात का?

बऱ्याचदा असं होतं की, खूप साऱ्या फाटलेल्या नोटा तुमच्याकडे असतात. किंवा काही अपघातामुळे रोख रकमेची नासधूस होते, आग लागणे, उंदराने लॉकरमधील नोटा कुरतडणे अशी कारणं यामागे असू शकतात. त्यावेळी प्रश्न तयार होतो, की तुम्हाला नोटची संपूर्ण रक्कम मिळते का? तर हे पूर्णपणे नोटची स्थिती आणि नोटांच्या मूल्यावर अवलंबून आहे. सामान्य फाटलेल्या नोटच्या बाबतीत, तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात, पण, जर नोटा अधिक फाटलेल्या असतील तर तुम्हाला काही टक्के रक्कम परत मिळते. हे गणित थोडं क्लिष्ट आहे ते सोपं करुन पाहू.

नोट बदलण्यास नकार दिला तर काय कराल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ATM मधून मिळालेल्या फाटक्या नोटा बदलण्यासाठी नियम केले आहेत. या नियमांनुसार, बँक एटीएममधून वितरीत झालेल्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत नाही.
जुलै २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले होते की, जर कोणत्याही बँकेने खराब नोटा बदलून घेण्यास नकार दिला तर संबंधित बँकेवर १०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल. ‘एटीएम’मधून सदोष किंवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. नोटेमध्ये काही दोष आढळल्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची चौकशी करावी. नोटेवर अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसल्यास बँकेला कोणत्याही परिस्थितीत नोट बदलून द्यावी लागेल.

नोट बदलून घेण्याच्या मर्यादा

फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी परिपत्रके जारी करत असते. अशा नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात सहजपणे बदलून मिळू शकतात. या नोटा बदलण्यासाठी एक निश्चित मर्यादा आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त २० नोटा बदलू शकते. या नोटांचे एकूण मूल्य ५००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. तथापि, खराबपणे जळलेल्या, फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात.

खराब-फाटलेल्या नोटांचं बँक काय करते?

प्रत्येक वर्षी करोडो रुपयांच्या नोटा खराब होतात, फाटतात. आरबीआय जवळ अशा नोटांचा ढीग साचतो. कारण चलनातील खराब आणि फाटलेल्या नोटा लोक बँकेत जाऊन बदलतात. या नोटा पुन्हा चलनात आणल्या जाऊ शकत नाही…म्हणून ह्या नोटांना नष्ट करावं लागतं. ह्या नोटांना नष्ट करण्याचा एक वेगळी प्रक्रिया असते. आरबीआय जवळ लाखोंच्या संख्येत अशा नोटा जमा होतात…त्यांना एका खोलीत जमा केले जाते. या नोटांना प्रत्येक वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाळून टाकते. आतापर्यंतचे आकडे बघितले तर २०१०-११ साली १ करोड २८५ नोटा ज्याचं मूल्य १ लाख ७८ हजार ८३० कोटी रुपये एवढं होतं त्यांना जाळण्यात आल्या आहेत. मात्र ह्या खराब –फाटलेल्या नोटा जाळल्याने खूप मोठ्या प्रमाणात धुर होतो. त्यासोबतच एका विशिष्ट प्रकारच्या कागद आणि शाईपासून पासून ह्या नोटा तयार होत असल्याने त्या जाळताना पर्यावरणाचे खूप नुकसानही होतं. त्यामुळे पर्यावरणाला होणारे नुकसान बघता आता या नोटा न जाळता त्यांचा उपयोग पेन स्टँड, पेपर वेट इत्यादी सामान बनविण्यासाठी केला जातोय. खराब आणि फाटलेल्या नोटांमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान बघता आता सरकार प्लास्टिकच्या नोटा तयार करण्याच्या विचारात आहे, ज्या खराब होणार नाहीत आणि फाटणारही नाहीत. ही योजना कधी अंमलात येईल हे अद्याप तरी समोर आलं नाही. मात्र जर तुमच्या जवळही फाटलेली नोट असेल तर ती बॅंकेत जाऊन बदलून घेण्याचा अधिकार तुमच्याकडं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!