Just another WordPress site

झिरो बॅलन्स बॅंक खाते म्हणजे काय? झिरो बॅलन्स बॅंक खात्याचे नेमके फायदे-तोटे काय?

आजच्या घडीला बँकेत खातं असणं गरजेचं आहे. सबसिडीसाठी, योजनेसाठी तसंच अनेक कामांसाठी बँकेतील खाते उपयोगी ठरतात. बँकेतील खात्याचे देखील अनेक प्रकार असतात. नोकरदारांचे, व्यापाऱ्यांचे खाते वेगवेगळे असते. त्यानुसार त्यांना सोयी-सवलती उपलब्ध करुन दिल्या जातात. तसाच एक प्रकार आहे झिरो बॅलन्स खात्याचा. दरम्यान, झिरो बॅलन्स खाते म्हणजे काय? त्याचे फायदे काय? याच विषयी जाणून घेऊ.
बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे बदललेली आहे. आता पुर्वीसारखं लांब रांगांमध्ये बँक खाते उघडण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन बँक खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काही आवश्यक कागदपत्र सबमिट केल्यास काही मिनिटांमध्ये बँक खाते उघडता येते. बचत केलेले पैसे बँकेत साठवून ठेवण्यासाठी बँका सेव्हिंग अकाउंटची सुविधा देतात. अशा प्रकारे सेव्हिंग अकाउंटची सुविधा घेण्यासाठी ग्राहकांना त्या खात्यात काही किमान रक्कम ठेवावी लागते. त्यापेक्षा शिल्लक रक्कम कमी झाली, तर बँकेकडून दंड भरावा लागू शकतो; मात्र बँकांमध्ये झिरो अकाउंटचीही एक सुविधा असते.

काय आहे झिरो बॅलन्स खाते?

देशात अशा अनेक छोट्या -मोठ्या बँका आहेत, त्या आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा पुरवतात. झिरो बॅलन्स अकाउंट हे कोणत्याही इतर बँक खात्यासारखंच असतं. फक्त या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक असावी अशी अट नसते. थोडक्यात काय तर झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते म्हणजे असं खातं असतं, की ज्या खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम रक्कम ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं तुम्ही तुमच्या खात्यामधून सगळे पैसे काढले तरीही बँकेकडून कोणताही चार्ज आकारला जात नाही. झिरो बॅलन्स खाते हे अशा ग्राहकांसाठी उपयुक्त असते, ज्यांचं मासिक उत्पन्न हे फिक्स नसते. किंवा ज्यांना आपलं खातं मेंटेन ठेवणं जमत नाही.

झिरो बॅलन्स खात्याचे फायदे

बँकेच्या या खात्यात ठरावीक रक्कम नेहमी शिल्लक ठेवावी लागत नाही. या खात्यातून व्यवहार करणंही सोयीचं असतं. कारण प्रत्येक वेळी किती रक्कम शिल्लक ठेवावी लागेल, याचा अंदाज घेऊन व्यवहार करावा लागत नाही. या खात्यातून नेटबँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करता येतात. या खात्याच्या खातेधारकाला बँकेचं पासबुक, एटीएम कम डेबिट कार्ड, तसंच मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा बँकेकडून मोफत दिली जाते.

झिरो बॅलन्स खात्याच्या मर्यादा काय?

झिरो बॅलन्स खात्याचे जसे फायदे आहेत, तशा काही मर्यादाही आहेत. या खात्यामध्ये ग्राहक वर्षाला १ लाख रुपयेच जमा करू शकतात. त्यापेक्षा जास्त रक्कम जमा ठेवायची असल्यास त्या खात्याला सेव्हिंग अकाउंटमध्ये बदलावं लागतं. अशा प्रकारच्या खात्यामधून एका महिन्यात केल्या जाणाऱ्या व्यवहारावरही मर्यादा असतात. या झिरो बॅलन्स खात्यामधून एफडी, आरडीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय नसतो.

देशात अशाही काही बँक आहेत, ज्या झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देखील चांगल्या सुविधा तसेच व्याजदर देतात.

आयडीएफसी फस्ट बँक

आयडीएफसी फस्ट बँकेमध्ये खाते उघडण्याचा मुख्य फायदा म्हणजे ही बँक झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर ग्राहकांना चार टक्क्यांपर्यंत व्याज देते. तसेच या बँकेच्या एटीएममधून तुम्ही एका दिवसात चाळीस हजारांपर्यंतची रक्कम काढू शकता. तसेच या बँकेत तुम्ही खाते सुरू केल्यास तुम्हाला बँकेकडून दोन लाखांपर्यंतचा अपघाती विमा देखील मिळतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया

ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेमध्ये ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर २.७ टक्के व्याज देण्यात येते. बँकेत सेव्हिंग खाते ओपन केल्यास बँकेकडून मोफत डेबीट कार्डची सुविधा पुरवण्यात येते.

येस बँक

एस बँकेमध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर चार टक्के दराने व्याज देण्यात येते. मात्र या बँकेमध्ये ज्यांना मासिक पगार मिळतो किंवा जे नोकरदार आहेत. असेच लोक इथे खाते ओपन करू शकतात. येस बॅंकेतील झिरो बॅलन्स खात्यातून तुम्ही एका दिवसात चाळीस हजारांपर्यंत रक्कम काढू शकता.

झिरो बॅलन्स अकाउंट कसं उघडावं?

हे खातं कोणीही सर्वसामान्य व्यक्ती उघडू शकते. बरेचदा हे खातं उघडण्याची सुविधा बँक ऑनलाइन उपलब्ध करून देते. त्यामुळं घरबसल्याही हे खातं उघडता येऊ शकतं. त्यासाठी
– बँकेची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅप उघडा.
– मोबाईल नंबर सबमिट करून प्रक्रिया सुरू करा.
– त्यानंतर विचारण्यात आलेले सर्व डिटेल्स सबमिट करा.
– आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स ही आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. याशिवाय,  २ पासपोर्ट साईज फोटोंची देखील आवश्यकता असते.

– त्यानंतर व्हिडीओ केवायसी व्हेरीफीकेशन करा.

– सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर खातेधारकाला  अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी नंबर पाठवला जाईल.
या नंबरचा वापर करून खातेधारकाला झिरो बॅलन्स सेविंग्स अकाउंटमध्ये सहज लॉग इन करता येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!