Just another WordPress site

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीचा इतिहास तरी काय? ‘जगदंबा’ तलवार इंग्लंडला गेली तरी कशी?

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची भवानी तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जगदंबा तलवारीचाही शोध लागला आहे. ही तलवार लंडनमध्ये आहे. ही तलवार २०२४ च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. दरम्यान, शिवाजी महाराजांच्या या तलवारीचा इतिहास काय आहे? ही तलवार कशी आहे? ही तलवार इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी 

१. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत
२. छत्रपती शिवरायांकडे एकूण ३ तलवारी होत्या
३. जगदंबा तलवार चौथे शिवाजी यांनी राजपुत्र एडवर्ड यांना दिली
४. जगदंबा तलवार परत आणण्यासाठी पहिला प्रयत्न टिळकांनी केला

 

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला त्यांनी मिळवलेलं स्वराज्य आठवतं, मोगलांशी दोन हात करताना त्यांना करावा लागणारा पराक्रमही नजरेसमोर येतो. त्याचवेळी त्यांची तलवारही आठवते. कारण याच तलवारीच्या जोरावर आणि कमी संख्येने असलेल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. मात्र, छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र, कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एकूण तीन तलवारी होत्या. तुळजा, भवानी आणि जगदंबा… या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केलं. ही तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या श्री शिवराजेश्वर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरच एका काचेच्या पेटीत ही तलवार ठेवण्यात आली आहे. तुळजा तलवार शहाजी राजे यांनी १६६२ साली शिवाजी महाराजांना दिली होती.
तर महाराजांच्या वापरात असलेली भवानी तलवार ही महाराष्ट्रातच असून साताऱ्याच्या छत्रपतींच्या खासगी संग्रही आहे. याची नोंद इतिहासात देखील आहे. सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर महालामध्ये भवानी तलवार आहे. त्यावर ‘सरकार राजा शाहू’ असे कोरले आहे.
तर लंडनच्या रॉयल कलेक्शनमध्ये असणारी जगदंबा तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी तलवार आहे. ही तलवार भारतात परत आणण्यासाठी आत्तापर्यंत अनेकदा प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणली जाणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

 

राज्य सरकारने काय म्हटलं?

सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार २०२४ पूर्वी परत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

जगदंबा तलवारीचा इतिहास काय?

इंग्लंडचा राजपुत्र एडवर्ड भारतभेटीवर आला असता, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराणा म्हणून दिली. ही भेट एक जुनी तलवार होती.. काहीशी नवीन काम करून, सुंदरपणे सजवून ही तलवार प्रिन्सला भेट दिली. हीच ती जगदंबा तलवार. ‘शोध भवानी तलवारीचा’ या पुस्तकाचे लेखक आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मतानुसार, जगदंबा तलवार चौथे शिवाजी यांनी १८७५-७६ मध्ये तत्कालीन इंग्लंडचे राजपुत्र एडवर्ड यांना दिली होती. नंतर हेच एडवर्ड इंग्लंडचे राजा एडवर्ड सातवे म्हणून ओळखले गेले. या प्रिन्सला जुनी शस्त्रं गोळा करण्याची आवड होती. त्यातून त्याने भारतातल्या राजे-महाराजांकडून अनेक शस्त्रं नेली.  कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हे अवघ्या ११ वर्षांचे होते. त्यांच्याकडून ही जगदंबा तलवार जबरदस्तीचं गिफ्ट म्हणून घेऊन गेला. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली होती. इंद्रजित सावंत यांनी पुस्तकातही ही बाब मांडली.

 

कॅटलॉगमध्ये नेमकं काय लिहिलं?

या भारतभेटीदरम्यान ‘नजराणा’ म्हणून मिळालेल्या वस्तूंची एक यादी बनवण्यात आली आणि हा मौल्यवान वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉग पुढे ‘Catalogue of the collection of Indian arms and objects of art’ या नावाने प्रकाशित करण्यात आला. या कॅटलॉगमध्ये चौथे शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून मराठा स्वराज्याची स्थापना करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांची’ होती, असे नमूद करून ठेवले आहे. कॅटलॉगमध्ये २ वेळेस या तलवारीस ‘शिवाजी महाराजांची तलवार’ असे संबोधण्यात आले आहे.

 

एडवर्ड यांना तलवार का भेट दिली?

काही इतिहासकारांनुसार, चौथे शिवाजी यांनी राजपुत्र एडवर्ड यांना जगदंबा तलवार आनंदाने भेट दिली नव्हती, तर ब्रिटिशांनी जबरदस्तीने ती तलवार भेट म्हणून घेतली होती. त्यावेळी चौथे शिवाजी यांचं वय केवळ ११ वर्षे होतं. इतर भारतीय राजांप्रमाणेच त्यांनाही ब्रिटिशांना मौल्यवान भेट देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शस्त्रांचाही समावेश होता. राजपुत्र एडवर्ड यांना शस्त्रास्त्र जमा करण्याची आवड होती. शिवाजी महाराजांची तलवार भेट मिळाल्यानंतर एडवर्ड यांनीही चौथे शिवाजी यांना तलवारच भेट दिली. ही तलवार कोल्हापूर येथील संग्रहालयात आहे.

 

जगदंबा तलवार इंग्लंडमध्ये कोठे आहे?

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार सध्या ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये आहे. रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या संग्रहात ही तलवार ठेवण्यात आली आहे. रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवर या तलवारीचा फोटोही पाहतो येतो. तेथे दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार १२७.८ x ११.८ x ९.१ सेंटीमीटर आहे. तलवारीच्या पात्याची लांबी ९५ सेंटीमीटर आहे. म्हणजेच ही तलवार तीन फुटापेक्षा काहिशी अधिक लांब आहे. या तलवारीचा क्र. २०१ आहे.

 

तलवार परत आणण्यासाठी कोणी-कोणी प्रयत्न केले?

शिवाजी महाराजांची ही तलवार इंग्लंडहून परत आणण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. यातला पहिला प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले. नंतरच्या काळात मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी इंग्लंडमध्ये भारताचा खटला मजबुत व्हावा म्हणून कागदपत्रांचीही जुळवाजुळव केली. या तलवारीला भवानी तलवार म्हटलं जातं. मात्र, भवानी तलवार आधीपासून साताऱ्यात असल्याचा युक्तिवाद ब्रिटिश करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!