Just another WordPress site

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ते कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांना वर्तक पोलिसांनी याप्रकरणी त्यांना अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता. अशातच आता त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. यावेळी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत मी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते नेमकं कलम नेमकं आहे तरी काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

प्रकरण तरी काय?

मागील काही दिवसांपासून आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

 

महिलेनं नेमकी काय तक्रार केली?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकलले, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) ३५४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कलम ३५४ काय आहे?

भारतीय दंड विधानातील ३५४ हे कलम विनयभंग तसेच लैंगिक छळवनुकीशी संबंधित आहे. या कलमांतर्गत गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार एक ते तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. एखादी व्यक्ती शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा लैंगिक संबंधाची मागणी करत असेल. महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्नोग्राफिक व्हिडीओ दाखवत असेल, तर त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते. किंवा त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच शिक्षा आणि दंडात्मक कारवाई अशा दोन्हींची तरतूद या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे.
याच कलमांतर्गत एखाद्या व्यक्तीने लैंगिकतेवर आधारीत शेरेबाजी केल्यास तिला लैंगिक छळाच्या आरोपाखाली एका वर्षाचा कारावास किंवा दंड भरण्याची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तसेच महिलेविषयी लैंगिक शेरेबाजी केल्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा आणि दंडात्मक कारवाई अशा दोन्हींची तरतूद या कलामामध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!