Just another WordPress site

काय सांगता ! चॉकलेटची चोरी केली म्हणून पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : आजपर्यंत पैसे, सोनं, धान्य चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण बीड (Beed) जिल्ह्यात चक्क चॉकलेट (Chocolate) चोरीची घटना घडली. चोरट्यांनी थोडीथोडकी नाही तर तब्बल दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी केली आणि त्याची विक्री देखील केली. अंबाजोगाई (Ambajogai) परिसरात हा प्रकार समोर आला. गणेश सखाराम मुनीम आणि राहुल वैजनाथ पवार अशी आरोपींची नावं असून त्यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीने पोबारा केला.

दोन महिन्यात दहा लाखांच्या चॉकलेटची विक्री

अंबाजोगाईमध्ये चॉकलेटचा गोदामात काम करणाऱ्या दोन नोकरांनी तब्बल दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करुन विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चॉकलेट चोरी करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई येथील व्यवसायिक प्रदीप वाघमारे यांच्याकडे चॉकलेटची एजन्सी असून त्यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणात चॉकलेटचा साठा करुन ठेवलेला आहे. याच ठिकाणी काम करणारे गणेश सखाराम मुनीम आणि राहुल वैजनाथ पवार या दोघांनी गोडाऊनची डुप्लिकेट चावी तयार केली आणि गेल्या दोन महिन्यापासून दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करुन विक्री केली आहे.

व्यवसायामध्ये तोटा झाल्याचं लक्षात आल्यावर नोकरांवर शंका

आरोपी राहुल आणि गणेश हे दोघे जण गेल्या अनेक वर्षापासून या गोडाऊनमध्ये काम करतात. मात्र मागील दोन महिन्यात गोदामातील चॉकलेट कमी होऊन व्यवसायामध्ये तोटा झाल्याचं प्रदीप वाघमारे यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी गोडाऊनमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि यामध्ये या दोन नोकरांनीच चॉकलेटची चोरी केल्याचं निदर्शनास आलं.

पाळत ठेवून नोकरांना पकडण्याचा प्रयत्न; एकाला अटक, एक पसार

राहुल आणि गणेश या दोघांनी वारंवार गोदामात चोरी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर प्रदीप वाघमारे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. अखेर प्रदीप वाघमारे यांनी काल रात्री अकराच्या सुमारास गोडाऊनमध्ये चोरी करताना त्या दोघांना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल पवार हा पळून जाण्यात यशस्वी झाला असून प्रदीप वाघमारे यांच्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या चोरीतील दुसरा आरोपी गणेश मुनीम याला अटक केली आहे. तर राहुल पवार यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!