Just another WordPress site

‘Rimjhim Gire Saawan’ गाणं ट्विट करत आनंद महिंद्रा म्हणाले, ‘आयुष्य तुम्हाला हवं तसं…’

Couple Recreates Rimjhim Gire Saawan Scenes : तुमचं वय काय, तुमचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला हे महत्त्वाचं नसतं; पण तुम्ही आयुष्य कसं जगता, जोडीदारावर किती निखळ प्रेम करता हे महत्त्वाचं असतं. कारण- वय वाढलं तरी जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण आनंदानं जगता आला पाहिजे. सोबत स्वप्नं बघता आली पाहिजेत. कारण- जीवनातील सुखाचे काही क्षण यातच दडलेले असतात. पण, वेगानं बदलणाऱ्या या युगात आपण जुन्या आठवणींत रमतो हे पाहून काही जण आपल्याला मूर्खात काढतात. पण, एका वृद्ध जोडप्यानं लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला आवडणारा एक जुना काळ खऱ्याखुऱ्या आयुष्यात पुन्हा जगला आहे. हे पाहून अनेकांना आपल्या शाळेतील पहिल्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

या वृद्ध जोडप्यानं सदाबहार ‘रिम झिम गिरे सावन’ गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. अगदी हुबेहूब जुन्या गाण्यातील तीच ठिकाणं वापरून हे गाणं शूट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर करीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीदेखील त्यांचं कौतुक केलं आहे. रिमझिम गिरे सावन या मूळ गाण्यात ज्या पद्धतीनं नृत्यदिग्दर्शन करण्यात आलंय. अगदी तसंच नृत्यदिग्दर्शन रिक्रिएशनमध्ये करण्यात आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे त्या काळात मुंबईच्या ज्या ज्या लोकेशनवर हे गाणं शूट झालं, ती सर्व लोकेशन रिक्रिएशनमध्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे हे रिक्रिएशन पाहताना तुम्हाला जुन्या गाण्याची फ्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तो योग्य रीत्या व्हायरल होत आहे. एका वृद्ध जोडप्यानं ‘रिमझिम गिरे सावन’ हे लोकप्रिय गाणं चित्रपटात मुंबईतील ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आलं, त्याच ठिकाणी पुन्हा ते तयार केलं गेलं. मी त्यांची स्तुती करतो. यातून ते आपल्याला सांगत आहेत की, जर तुम्ही तुमची कल्पना योग्य प्रकारे मांडली, तर तुम्ही आयुष्य तुम्हाला हवं तसं सुंदर बनवू शकता!

शैलेंद्र इनामदार आणि त्यांची पत्नी वंदना इनामदार या रिल आणि खऱ्या आयुष्यातील जोडप्यानं रिमझिम गिरे सावन या गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. तर, अनूप आणि अंकिता रिंगणगावकर या जोडप्यानं हे गाणं चित्रित केलं आहे. यात त्यांचा मुलगा अपूर्व यानं चित्रीकरण एडिट केलं आहे. गाण्याचं हे रिक्रिएशन सोशल मीडिया युजर्सना खूप पसंत पडलं आहे; ज्यावर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांनी अभिनय केला होता; तर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी ते गायलं होतं. बासू चॅटर्जी दिग्दर्शित मंझिल या चित्रपटात हे गाणं दाखवण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!