Just another WordPress site

मोदींची १२ कोटीची कार, पण तेव्हा १२ हजारांची कार घेण्यासाठी शास्त्रीजींना घ्यावं लागलं होतं कर्ज

अनेकदा आपल्याला कोणत्याही क्षेत्रातली पहिली व्यक्ती कोणंय हे लक्षात राहतं. पण, दुसरा नंबर कोणाचा हे मात्र विसरून जातो. पण लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत तसं झालं नाही. ते या सिध्दांताला अपवाद ठरले. देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून ते आजही प्रत्येक भारतीयाला लक्षात आहेत. लाल बहादूर शास्त्रींनी ज्या धाडसानं देशासाठी पंतप्रधान पदावर असतांना कार्य केलं ते इतर कोणत्याही पंतप्रधानाच्या कारकिर्दीत पाहायला मिळालं नाही. आज त्यांची पुण्यतिथी. याच निमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊ.

समाजवादी देशभक्त आणि काँग्रेस नेते एवढीच लाल बहादूर शास्त्रींची ओळख सर्वांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही शास्त्रीजींचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान खूप मोठं आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शास्त्रींजींना खरी ओळख मिळाली. ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा देत ते भारतीय जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले. शास्त्रीजींच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या शास्त्रीजींनी आयुष्यभर साधेपणा जपला. त्यांच्या प्रामाणिकतेचे अन् साधेपणाचे किस्से सांगितले तर कदाचित आजच्या पीढीला असा माणूस होऊन गेला यावर विश्वासही बसणार नाही.

लाल बहादूर शास्त्री हे शेती करायचे. आता तुम्ही म्हणाल यात काय खास. तर, खास बाब ही आहे की, शास्त्रीजी पंतप्रधान भवनातही शेती करत होते. त्याचं झालं असं की, नेहरूजींच्या निधनामुळं शास्त्रीजींना ९ जून १९६४ रोजी पंतप्रधान पदावर बसवण्यात आलं. शास्त्रीजी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा देशाला एका कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी चीनने भारतावर अचानक हल्ला केला होता. हा हल्ला आणि पंडित नेहरूंचा मृत्यू या धक्क्यातून सावरणे देशवासीयांसाठी कठीण काम होते. शिवाय, देशात अन्नधान्याचा तुटवडा ही मोठी समस्या बनत चालली होती. तेव्हा शास्त्रीजींनी स्वत:चं मानधनही स्वीकारले नव्हतं. एवढचं काय तर, शास्त्रीजींनी स्वतः या शेतीतून अन्नधान्य उगवण्याची तयारी केली. त्यासाठी जनपथ येथील पंतप्रधान निवासाच्या आवारातच त्यांनी शेती केली. पण दुर्दैवाने स्वतः शास्त्रीजी या पिकाचा आस्वाद घ्यायला जिंवत राहिले नाहीत. तेव्हा शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर शास्त्रीजींचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी ललितादेवी यांनी स्वत: हातात खुरपे घेऊन जनपथवर जाऊन हे पीक स्वत: काढलं होतं. आजच्या युगात एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने असं करणं आश्चर्यकारक वाटेल.

असाच एक त्यांचा आणखी एक किस्सा आहे. सरकारकडून लाल बहादूर शास्त्री यांनी एक कार देण्यात आली होती. पण एकदा त्यांच्या मुलानं ही गाडी आपल्या खासगी कामासाठी वापरली. ही गोष्ट जेव्हा बहादूर शास्त्री यांना कळली तेव्हा त्यांनी शास्त्रीजींनी त्यांच्या मुलाला समज दिली आणि त्याने जेवढी गाडी वापरली तेवढ्या किलो मीटरचे पैसे सरकारी खजान्यात जमा केले होते. त्यांच्यावरील एका पुस्तकात सांगितलंय की, ते पंतप्रधान असताना त्यांच्या मुलाने कार घ्यायचा हट्ट केला. तेव्हा त्यांनी एक फियाट कार खरेदी केली होती. तेव्हाच्या काळी बारा हजार रुपयांची असलेली ही कार घेण्यासाठी पाच रुपये लाल बहादूर शास्त्रींकडे कमी पडले. त्यांच्या फक्त सात हजार रुपये बँकेतील खात्यात होते. त्यामुळे त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून पाच हजार रुपयांचं कर्ज काढलं होतं. दिल्लीतील शास्त्री मेमोरीयलमध्ये हा यादगार किस्सा आजही ठेवण्यात आलाय.

लालबहादूर शास्त्री खासदार असतांना त्यांना घरखर्च भागवणे कठिण जात असायचे. त्यावेळी खासदारांना जेमतेम ५०० रुपये पगार होता. त्यात घरात भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची. त्यामुळे घरखर्चासाठी अतिरीक्त पैशै कसे जमवायचे या विवंचनेत शास्त्रीजी होते. कुलदीप नायर य़ांनी त्यांना चार वर्तमानपत्रात स्तंभलेखण करण्याचा सल्ला दिला. त्यानूसार लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहीयाचे. त्यातून महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २ हजार रुपये मिळायचे. त्यातून शास्त्रींजीचा अतिरीक्त घरखर्च भागायचा. कुलदीप नायर यांनी ‘बियॉंड द लाईन’ या त्यांच्या आत्मचरीत्रात हा किस्सा सांगितलाय. एवढचं नाही तर अशा परिस्थितही शास्त्रीं आपल्या पगारातील मोठा वाटा विविध गांधीवादी लोकांच्या कल्याणासाठी दान करत.

कामराज योजनेमुळे मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी जुंपण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांचीही मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला कुलदीप नय्यर गेले. बंगल्यात पूर्णपणे काळोख होता. लाल बहादूर शास्री दिवाणखान्यात बसले होते. केवळ तिथलेच लाईट सुरू होते. दिवे का बंद केलेत, हा प्रश्न विचाल्यावर शास्त्रीजींनी उत्तर दिले. ‘‘आता मी मंत्री राहिलो नाही. हे वीजबिल मलाच भरावे लागेल. ते मला कुठे परवडणार? त्यामुळे आवश्यक तेवढी वीज मी वापरायचे ठरवले.

दरम्यान, ११ जानेवारी १९६६ रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. १० जानेवारी १९६६ ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं आकस्मिक निधन झाले. त्यांना कार्डियाक अॅटॅक आल्याचे सांगितलं जातं. मात्र, देशाच्या दुसऱ्या पंतप्रधानाच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अद्यापही गूढच कायम आहे. राजधानी दिल्लीत असणारे शास्त्रींचे समाधीस्थळ ‘विजय घाट’ म्हणून ओळखलं जातं. आजही शास्त्रीजींचं हे समाधिस्थळ अनेकांसाठी स्फूर्तिदायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!