Just another WordPress site

Treasure In Sea : काय सांगता ! तब्बल साडेतीनशे वर्षापूर्वी बुडालेल्या जहाजात सापडलं सोन्या-चांदीचं घबाड; पाहून शोधणारेही थक्क…

एखाद्या जुन्या जहाजात अनमोल खजिना सापडल्याच्या घटना तुम्ही चित्रपटात किंवा काल्पनिक कथांमध्ये पाहिल्या असतील. ऐकल्या असतील. मात्र, चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशीच एक घटना वास्तवात घडली. संशोधकांच्या एका टीमला जुन्या जहाजात सोन्या-चांदीचा मोठा खजिना मिळाला. हा खजिना पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच डोळे विस्फारले असतील, यात शंकाच नाही. याच खजिन्याविषयी जाणून घेऊ.

महत्वाच्या बाबी

१. ४ जानेवारी १६५६ रोजी बुडालं होतं जहाज
२. जहाजात होता  ३.५ दशलक्ष सोन्याचा खजिना
३. या खजिन्याचा काही भाग समुद्रात सापडला
४. सापडलेल्या खजिन्याची किंमत लाखो डॉलरच्या घरात

समुद्राच्या खोल पाण्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत, जी हळूहळू उघड होताहेत. असेच एक रहस्य नुकतंच जगासमोर आलं. सुमारे ३६० वर्षांपूर्वी म्हणजे, ४ जानेवारी १६५६ रोजी स्पेनचं एक जहाज क्यूबाहून सेव्हिलला जात होतं. ते जहाज बहामा बेटांजवळील लिटिल बहामास बँकजवळील एका मोठ्या खडकाला आपटलं आणि पुढच्या अर्ध्या तासात ते समुद्रात गडप झालं.  या जहाजात खूप मोठा  मौल्यवान खजिना होता. आता या खजिन्याचा काही भाग समुद्रात सापडला. हा खजिना जरी खूप वर्षांपूर्वीचा असला तरी त्यांची किंमत ही लाखो डॉलरच्या घरात आहे. हा खजिना माणूसच काय एखाद्या लहानश्या देशाचंही नशीब बदलू शकतो. यात जुने शिक्के, किंमती खडे, रत्न आहेत. स्पेनच्या नुएस्ट्रा सेनोरा डे लास माराविलासी जहाजावर हा खजिना सापडला.

हा खजिना शोधणार्‍यांनी दावा केला की, समुद्राखाली अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात. तब्बल ३६० वर्षानंतर जहाज शोधणे आव्हानात्मक होते. शिवाय जहाज बुडाल्यानंतर त्याचे अवशेष अनेक किलोमीटरपर्यंत पसरले होते. या जहाजाचे वजन ८९१ टन होते. या जहाजातून ६५० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी केवळ ४५ लोकांना वाचविण्यात यश आलं होतं.  तर ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार या जहाजात ३.५ दशलक्ष सोने-चांदीचे नाणी आणि दागिने होते. जहाजात असलेला सोन्याचा खजिना परत मिळवण्यासाठी काही प्रयत्न केल्याचे वृत्त यापूर्वी अनेकदा आलं होतं. त्यापैकी १६५६ ते १९९० च्या सुरुवातीच्या काळात फक्त ८  नाणी सापडली होती. अ‍ॅलन एक्सप्लोरेशनचे संस्थापक कार्ल अ‍ॅलन यांनी एका प्रसारमाध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत या जहाज आणि खजिन्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमने जुलै २०२० मध्ये वॉकर के आयलँडजवळ मौल्यवान कलाकृतींचा शोध सुरू केला होता. हे बेट बहामासच्या उत्तरेस आहे. यासाठी हाय रिझोल्युशन मॅग्नोमीटर, जीपीएस, मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला होता. त्यांनी जहाजाचे बहामासच्या उत्तरेकडील अवशेष शोधण्यासाठी बहामास सरकारची परवानगी घेतली होती.  येथे शोध सुरू झाला तेव्हा अनेक अभूतपूर्व गोष्टी समोर आल्या. कार्ल अ‍ॅलन यांनी सांगितले की, जहाजाच्या शोधात पन्ना, नीलम अशी रत्न, टोप, ३ हजार चांदीची नाणी आणि २५ सोन्याची नाणी सापडली. चायनीज पोर्सिलेन, लोखंडी साखळ्याही सापडल्या. चांदीच्या तलवारीचे हँडलही सापडले. तसेच चार पेंडंट, धार्मिक चिन्हेही आढळून आली. तसेच ८८७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेनही सापडली.

दरम्यान, सापडलेल्या गोष्टी अमूल्य असून बहामासच्या मेरीटाईम म्युझियम ऑफ अ‍ॅलन एक्सप्लोरेशनमध्ये ठेवल्या जातील.  या जहाजाने केवळ इतिहासाची पानेच उघडली नाहीत तर अतुलनीय खजिन्याचे भांडारही उघडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!