Just another WordPress site

जालण्यात हत्येचा थरार! बायकोला लेकरू-बाळ होत नसल्यानं पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या!

जालना : जुना जालना परिसरातील शंकरनगर भागात विवाहित महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहिता आत मृतावस्थेत सापडली असताना, घराला बाहेरुन कडी होती. तर महिलेचा पतीही फरार असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय आहे. मूलबाळ होत नसल्याने पतीनेच पत्नीचा जीव घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

औद्योगिक वसाहतीत मजुरीचे काम करीत असलेला किशोर आटोळे व त्याची पत्नी इंदुबाई आटोळे हे जोडपे शंकरनगर भागात भाड्याने खोली घेऊन काही महिन्यांपासून वास्तव्याला आहेत. मूळचे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेळगाव येथील किशोर हा पोटापाण्यासाठी मजुरी करायला सपत्नीक जालन्यात राहायला आला.

आज सकाळी उशिरापर्यंत आटोळे यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली आढळून आल्याने घर मालकाने जवळच राहणाऱ्या आटोळे यांच्या बहिणीला बोलावून घेतले आणि खोली उघडली. त्यावेळी पलंगावर इंदूबाई किशोर आटोळे (वय ४० वर्ष) ही मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर मार लागल्याचा मोठा घाव होता.

घरमालकाने तातडीने घटनेची माहिती कदीम जालना पोलिसांना कळवली. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे,पोलीस हवालदार कैलास जावळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.

पती किशोर आटोळे हा अद्याप सापडलेला नसल्याने त्याने खून करुन पोबारा केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. चाळिशी येऊनही पत्नीची कूस उजवली नसल्याच्या कारणावरुन किशोर यानेच इंदूबाईंचा खून केला असल्याचंही बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!