Just another WordPress site

भीषण अपघात! कारवरील नियंत्रण सुटल्यानं ऋषभ पंतची BMW दुभाजकावर आदळली, कारने घेतला; पंत गंभीर जखमी

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीचा दिल्लीनजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोळ्याला आणि शरीरावर अन्य ठिकाणी अनेक जखमा झाल्याची माहिती आहे. सध्या त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. परंतु, ऋषभ पंत याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येईल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ पंत आपल्या काही मित्रांसह दिल्लीहून रुरकीच्या दिशेने जात होता. त्यावेळी ऋषभ पंत याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. सुदैवाने ऋषभ पंत आणि त्याचे मित्र वेळीच गाडीतून बाहेर पडले. त्यानंतर ही गाडी जळून खाक झाली. या अपघातामध्ये ऋषभ पंत याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ऋषभ पंतवर तातडीने प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुरकी येथील नारसन परिसरात ऋषभ पंत याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रेलिंग आणि खांब तोडून उलटी झाली. यानंतर कारला आग लागली. काही स्थानिकांनी ही आग कशीबशी विझवली. त्यानंतर जखमी अवस्थेतील ऋषभ पंत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंत याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ऋषभ पंत अगोदरच जमखी होता…!

भारतीय क्रिकेट संघाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही मालिकेतून ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने त्याला वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही, मात्र ऋषभ पंतला दुखापत झाल्याचे सूत्रांकडून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!