Just another WordPress site

तुमच्या मोबाईलवर दिसणार कोर्टाची सुनावणी, आज पासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज लाइव्ह

न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण आता देशवासीयांना पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल त्यासाठी परवानगी दिली असून सर्वोच्च न्यायालयापासूनच याची सुरुवात होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून झाल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सामान्य माणसांना त्यांच्या मोबाईलवरही पाहता आलं. देशाच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं मानल्या जातंय.

 

महत्वाच्या बाबी

१. न्यायालयीन कामकाज आता लाइव्ह पाहता येणार
२. रमण्णा यांनी दिले होते थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भात निर्देश
३. webcast.gov.in/scindia/ यावर पाहता येईल सुनावणी

 

सुप्रीम कोर्टात आजवर अनेक सरन्यायाधीश होऊन गेले. न्यायाधिश बदलतात. मात्र, व्यवस्था बदलत नाही. मात्र केवळ ७४ दिवसांची कारकीर्द असणाऱ्या सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सु्प्रीम कोर्टाची सुत्रे हाती घेताच, त्यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरूवात केली. काल पर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असतं की, सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता लाईव्ह पाहता येणार आहे, तर यावर तुम्हाला विश्वास ठेवायला अवघड गेलं असतं. मात्र, सरन्यायाधीश ललित यांनी बोलावलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या बैठकीत सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला. खरंतर सुप्रीम कोर्टाची सुनावणी सामान्य नागरिकांना ऐकण्यास खुली करण्यात यावी ही मागणी जुनीच होती. मात्र ती जस्टीस लळीत यांच्या कार्यकाळात मान्य करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, याबाबत २०१८ साली सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकाकर्त्यांमध्ये ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांचाही समावेश होता. यानंतर मार्च २०१८ मध्ये न्यायालयाने भारताचे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून संबंधित याचिकेवर त्यांचं मत मागवलं होतं. यावर चाचणी म्हणून घटनापीठांसमोरील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्याची शिफारस वेणुगोपाल यांनी केली होती. मात्र नंतर त्यावर काही कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांनी थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भातील निर्देश दिले होते. विशेष म्हणजे न्या. रमण्णा यांनी पदावर असतानाच्या शेवटच्या दिवशी ही सूचना केली. आणि काल सरन्यायाधीश उदय लळीत यांनी लवकरच सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी या न्यायालयाच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपित केल्या जातील अशी माहिती दिली. युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण करण्याऐवजी न्यायालय स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन ही सेवा उपलब्ध करुन देईल, असा विश्वास सरन्यायाधिशांनी व्यक्त केला. आणि आज कोर्टाचं सुनावणीचं कामकाज लाईव्ह झालं. कोर्टानं घेतलेल्या या निर्णयामुळं सुप्रीम कोर्टातील कोणतीही कार्यवाही तुम्हाला या webcast.gov.in/scindia/ संकेतस्थळावर पाहता येईल.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!