Just another WordPress site

सावरकरांबद्दलचं वक्तव्य भोवलं; राहुल गांधींविरोधात कलम ५००, ५०१ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही काल मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

या प्रकरणी ठाणे नगर पोलीस स्थानकात आयपीसीच्या ५०० आणि ५०१ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य सावरकरांची बदनामी करणारे आणि लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

सर, मी आपला सेवक राहू इच्छितो, असे माफीपत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिले होते. तसेच महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही त्यांनी पत्रावर सही करायला सांगितले होते, असे स्पष्ट करून सावरकरांनी देशाचा तसेच तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा विश्वासघात केला, अशी टीका काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी वाडेगाव (अकोला) येथे केली होती.
सावरकरांच्या या कृतीबद्दलचा इत्थंभूत तपशील माझ्याकडे आहे. राज्यात यावरून काही लोक यात्रा रोखायची भाषा करत आहेत. मात्र, सरकारला वाटत असेल; तर यात्रा रोखून दाखवावी, असे आव्हानही राहुल गांधी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले होते.
सावरकरांनी लिहिलेल्या माफीनाम्याची प्रत राहुल गांधी यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दाखवली. हे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना दाखवण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले होते.

सत्ताधार्‍यांचा न्याय, तपास यंत्रणांवर दबाव!

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुरुवारी पातूर येथून वाडेगावात दाखल झाली. त्यानंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षांकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे; तर न्यायव्यवस्थेवरही दबाव आणला जात आहे. याशिवाय देशात सर्वसामान्यांनाही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरुणांना नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्य सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य हवालदिल झाले आहेत. सरकारी शाळा, सरकारी दवाखाने सुसज्ज करण्याऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसा उद्योगपतींकडे कसा जाईल, यावरच सरकारचे जास्त लक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!