Just another WordPress site

जयललितांच्या मृत्यूला शशिकला जबाबदार, चौकशी समितीचा निष्कर्ष; कोण आहेत व्हि. के. शशिकला?

तमिळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युविषयी चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला. या अहवालात जयललिता यांच्या जवळच्या सहकारी शशिकला यांच्यासह एक वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना दोषी ठरवले गेले.

 

महत्वाच्या बाबी

१. जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल सादर
२. जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकलांवर करण्यात आले आरोप
३. जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकला यांची चौकशी करा- अहवाल
४. शशिकला यांच्यासह अन्य दोघांना ठरवले जयललितांच्या मृत्युला जबाबदार

 

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल मंगळवारी तमिळनाडू सरकारने विधानसभेत सादर केला. जे जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती अरुमूघस्वामी आयोगाने हा अहवाल तयार केला. या अहवालात सांगितले की, व्ही. के. शशिकला या जयललिता यांच्या जवळच्या सहकारी होत्या. त्या जयललितांसोबत त्यांच्याच घरात राहत होत्या. जयललिता आजारी पडल्यापासून त्यांच्या मृत्युपर्यंत शशिकला त्यांच्यासोबत होत्या. दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू व्ही के शशिकला यांचा काही यात दोष आहे का आणि हे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले जावेत, असा अंतिम निष्कर्ष निवृत्त न्यायमूर्ती ए अरुमूघस्वामी आयोगाने त्यांच्या अहवालातून काढला. या आयोगाने शशिकला यांच्यासह इतरांचीही नावे अहवालात नमूद केलीत. डॉ. के. एस. शिवकुमार हे जयललितांचे खासगी डॉक्टर होते. त्यांच्यावरही आरोप केला गेला. राधाकृष्णन हे तत्कालीन आरोग्य सचिव होते, ते जयललिता यांच्या आरोग्याची काळजी घेत होते, त्यांच्यावरही संशय व्यक्त केला गेला आहे. सी. विजयभास्कर हे तत्कालीन आरोग्यमंत्रीही जयललिता यांच्या निकटचे मानले जात होते. ते बुलेटिनद्वारे हेल्थ अपडेट देत होते. त्यांनाही चौकशी समितीने संशयाच्या भोवऱ्यात उभे केले गेले.

जयललिता या मुख्यमंत्री असताना २०१६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले होते. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्या दोन महिने रूग्णालयात होत्या. १९९१ मध्ये जयललिता जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा शशिकलांशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघींची जोडी तामिळनाडूच्या राजकारणात अम्मा आणि चिन्नमा म्हणून प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली होती. त्यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. पण गेल्या काही वर्षांत १४ वेळा या आयोगाचा कार्यकाळ वाढवण्यात आला. दरम्यान, आता जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती अरुमूघस्वामी आयोगाने आपला ५९० पानांचा अहवाल सादर केला होता. यात निवृत्त न्यायमूर्ती अरुमूघस्वामी यांनी माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, जयललिता यांचे अंगरक्षक, त्यांची पुतणी दीपा आणि पुतण्या दीपक, त्यांचे निकटवर्तीय शशिकला यांचे नातेवाईक, जयललितांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात ड्युटीवर असलेले IAS-IPS अधिकारी, डॉक्‍टर, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा १५८ साक्षीदारांचे जबाब नोंदवून व्हि के शशिकला यांच्या चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, जयललिता आणि शशिकला एकमेकींच्या संपर्कात कशा आल्या? याचं अजूनही अनेकांना कोडं आहे. जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती असलेल्या व्हि के शशिकला आणि जयललिता या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही… कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची त्यांना माहिती असायची. १९७० च्या सुमारास शशिकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशिकला यांचे पती पीआरओ म्हणून काम करत होते. आणि ते ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होते, तो जयललितांच्या जवळचे होते. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशिकला यांनी जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच त्या जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनल्या. एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशिकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता शशिकला यांना आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. शशिकला यांच्यासोबत त्यांची बहीण आणि मुलंही राहण्यासाठी गेले. शशिकला यांच्या एका सुधाकरन नावाच्या भाच्याला जयललिता यांनी दत्तक घेतलं. दत्तक घेतलेल्या याच सुधाकरनच्या भव्यदिव्य लग्नामुळे जयललिता यांच्या संपत्तीवर आयकर विभाग आणि माध्यमांचं लक्ष गेलं. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा त्या मुख्यमंत्री होत्या. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशिकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशिकला यांची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर २०११ मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग १०० दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशिकल यांचा कळवळा आला, आणि जयललितांनी शशिकला यांना माघारी बोलावलं. पुढं जयललिता यांच्यानंतर शशिकला यांनाच पक्षाच्या क्रमांक दोनच्या नेत्या मानलं जात होतं. पक्षाची धोरणं आणि संवाद कौशल्य यामुळे शशिकला यांची ताकद पक्षात वाढत गेली. कालांतराने शशिकला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी २०१७ मध्ये न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. दरम्यान, या आयोगाने आता जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी शशिकला यांच्या चौकशीचे आदेश दिले असून या चौकशीतून काय समोर येतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!