Just another WordPress site

सारथीच्या उदघाटनावरून फुटले वादाला तोंड, कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांचे नावच नसल्याने मराठा समाज आक्रमक

नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या सारथी कार्यालयाच्या (sarthi Office) उदघाटनावरून वादाला तोंड फुटले असून सारथीच्या उदघाटन कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrpati) यांचे नावच नसल्याने मराठा संघटना (Maratha Organization) आक्रमक झाल्या आहे. सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावललं, असा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिला आहे. येत्या २१ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी संभाजीराजे छत्रपती नेहमीच तत्पर असतात. याच अनुषंगाने संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुणे येथील सारथीच्या धर्तीवर नाशिकमध्ये सारथीचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विदयार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये वसतिगृह, अभ्यासिका त्याचबरॊबर इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना या सुविधा घेण्यासाठी पुणे येथे जावे लागायचे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक वर्षांपासून त्या त्या जिल्ह्यात सारथीचे कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा केला होता.

दरम्यान सारथीचे केंद्र नाशिकमध्ये व्हावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते. या प्रयत्नानंतर अखेर सारथीचे कार्यालय नाशिकमध्ये आले. याच सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यास बरोबर इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच संभाजीराजे छत्रपती यांना देखील आमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याचा आरोप स्थानिक मराठा संघटनांनी केला आहे. त्यावरून नवा वाद उपस्थित झाला आहे.

 

संघटेनचे कार्यकर्ते आक्रमक

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे होत आहे. नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादाभुसे, अतुल सावे या मंत्र्याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्यांनी विभागात सारथीच्या कार्यालयाची मागणी केली त्यांनाच उद्घाटनाला न बोलविल्याने संभाजी राजे छत्रपती यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. सारथी संस्थेच्या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपतींना डावलल्याचा आरोप होत असून कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!