Just another WordPress site

मुंगळा शेतशिवारात परतीचा पाऊस शेतकऱ्यांना रडवतोय, कापणी केलेली पिके शेतातच सडताहेत, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर

मालेगाव : वर्षभर शेतात काबाड कष्ट केल्यानंतर शेतमाल काढणीची वेळ आली असताना मालेगाव तालुक्यातील मुंगळा, रेगाव, खेरडी, मेडशी या गावात परतीच्या पावसाने हाहाकार माजवत शेतीमालाचे प्रचंड नुकसान केलंय. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकांची दयनीय अवस्था झाली. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन सणासुदीच्या दिवसात संकट कोसळले.

यंदा विदर्भात वारंवार आलेल्या पुरानं शेतीची माती केली. यातून बचावलेल्या शेतपिकातून चार पैसे हातात येतील अन दिवाळीत थोडाफार का होईना घरात दाटलेला अंधार दूर होईल, ही आशा बळीराजाला होती. मात्र, बळीराजाचा आशेवर परतीचा पावसाने पाणी फेरलं. परतीचा पाउसही धो धो बरसला अन सोयाबीनच्या झाडाला लागलेल्या शेगांनाच अंकूर आला. मुसळधार पावसामुळं नुकसान झालेल्या शेतपिकांची भरपाई अद्याप मिळालेली नाही. बळीराजाचा चंद्रमोळी झोपडीत दिवाळीचा दिवा पेटणार काय ?, असा सवाल शेतकरी करत आहेत. बळीराजाचं दुःख आभाळा ऐवढं. मात्र दसरा मेळाव्यात कोण श्रेष्ठ ठरलयं याचं गणित जूळविणात गुंग झालेल्या लोकप्रतिधीना त्याच काय घेणं न देणं नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

तसा शेती हंगाम बेभरवशाचा खेळ आहे. कधी होत्याचे नव्हते होईल. याचा नेम नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा खरं ठरलं. आता पिके माल धरण्याच्या अवस्थेत असतांना गत महिन्यापासून पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
दरवर्षी शेतकरी एकच विचार करून शेतात पेरणी करतो की या वर्षी चांगले उत्पन्न होईल आणि देणे करांचे देणे चुकते होईल. मात्र, असं होत नाही. यंदाही मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नागरिक हैराण झाले असून शेतकरी मेटाकुटीला आले. दोन दिवसापासून मालेगाव तालुक्यातील मुंगळा, रेगाव, मेडशी, तिवळी, वसारी, घाटा मिझापूर, दुधाळा, किनी घोडमोड शेलगाव बागडे वाघी, करंजी डोंगरकिन्ही, पांगरखेडा, चांडस, धारपिंपरी, एकांबा या परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. सतत पडणाऱ्या पावसाचा फटका शेतीला बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले होते. त्यातच गेल्या महिनाभरापासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला. काढणीयोग्य झालेली पिके शेतकऱ्यांना पावसामुळे काढता आलेली नाहीत. शेतातच या पिकांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे अक्षरक्ष: कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर तेवढेच पीक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही दिवसभर उघडीप दिलेला पाऊस सायंकाळी बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना होताना दिसत आहे

अगोदरच काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती यावेळी हे पिके वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली आणि पिके चांगली सुद्धा आली. मात्र, आता पावसाने कहर केल्यानं पिकांचे मोठं नुकसान झालं. आताही गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली. याचा मोठा फटका, सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांना बसला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळं शेतकऱ्यांचे यंदा अक्षरश: दिवाळे निघालं असून यंदा तरी देणे कऱ्यांचे पैसे चुकवता येतील, या बळीराजाचा आशेवर पाणी फेरलं आहे. ऐन दिवाळीत निघाणाऱ्या सोयाबीन पिकाचं परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलं. झाडावर असलेल्या सोयाबीनच्या शेंगाना अंकूर फुटला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली, त्यांचं पिकं शेतातचं आडव पडलं. हा परतीचा पाऊस कापणी केलेलं पिक जमा करायला देखील बळीराजाला सवड देईना. परिणामी या पावसाने शेतकऱ्यांनी कापणी केलेलं पिक शेतात आडवच भिजत आहे. त्यामुळं सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. शिवाय, या कापणी केलेल्या सोयाबीनंच्या शेंगाही या पावसामुळं झडून जाताहेत. हाती आलेल्या पिकांची नासधूस होत असल्याने बळीराजापुढे मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं असून त्यामुळं बळीराजा पुरता खचला. आधीच निसर्गाच्या लहरीपनामुळे हतबल झालेल्या बळीराजाने बॅंकांचे-सोसायट्याचे उंबरठे झिजवून पीकांची लागवड केली. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च केला तो निघणं मुश्कील असल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली. एकूणच ही पावसाची परिस्थिती पाहता “ये बाबा आता तरी थांब ना” अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत असून शेतकाऱ्यांसह शेतमजूरही हवालदिल झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत परतीच्या पावसाने नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या मालेगाव तालुक्यातील नशिबी आले.

ऑगस्टमध्ये झालेल्या पावसानंतर नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे झाले त्याची मदतही अजून पदरी पडलेली नसल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर ही दिवाळी बळीराजासाठी अंधारमय ठरू शकते. सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा करेल आणि आपल्याला मुलाबाळांची दिवाळी गोड करता येईल अशी आशा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे. मात्र, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभावामुळे सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारातच घालवण्याची वेळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर आली. दरम्यान, आता गेंड्याची कातडी असलेलं सरकार कर्तव्य म्हणून आर्थिक मदत करते, की, हे शेतकरी सुल्तानी संकटाचेही बळी ठरतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!