ठाकरेंना मिळालं मशाल चिन्ह, सेना आणि मशाल याचा इतिहास तरी काय? हे चिन्ह ठाकरेंसाठी फायद्याचं ठरणार का?
एकनाथ शिंदे यांनी बंड घडवून आणल्यानंतर शिवसेनेची संपूर्ण घडी विस्कटली. बंडानंतर शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा सांगितला. त्यांनंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वादामध्ये निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घातली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली. तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं. हे चिन्ह आहे धगधगती मशाल. याच निमित्ताने शिवसेना आणि मशाल याचं नातं काय? हे चिन्ह उद्धव ठाकरेंसाठी गेमचेंजर ठरणार का? याच विषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं
२. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नाव
३. उद्धव यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्ह मिळालं
४. भुजबळ १९८५ साली सेनेतून मशाल या चिन्हावरच निवडणूक लढले
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला. शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नाव मिळालं. तर मशाल हे पक्षचिन्ह मिळालं. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. मात्र, शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. दरम्यान, ठाकरे गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल चिन्हाचे आणि शिवसेनेचे जुने नाते आहे. या मशालीचा एक इतिहास शिवसेनेत आहे. उद्धव यांच्या गटाला आता निवडणूक आयोगाकडून जे मशाल चिन्ह मिळालं आहे त्या चिन्हाचा बाळासाहेबांशी थेट संबंध आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेना स्थापन केली. मात्र १९८९ पर्यंत पक्षाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. मात्र त्याआधी शिवसेनेला अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता मिळेपर्यंत शिवसेनेकडून विविध चिन्हांवर निवडणूक लढवली गेली होती. यामध्ये रेल्वे इंजिन आणि उगवत्या सूर्यासह मशाल या चिन्हाचाही समावेश होता. सध्या राष्ट्रवादीत असलेले छगन भुजबळ हे १९८५ साली शिवसेनेतून मशाल या चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकलेही होते. भुजबळ ‘मशाल’ चिन्हावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मशाल चिन्हावर निवडणूल लढवणारे भुजबळ त्या वेळी शिवसेनेचे एकमेव आणि पहिले आमदार ठरले आहेत. त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. या चिन्हावर शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला. तेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मिळालं. त्यामुळे शिवसेना आणि मशाल हे नातं काही नवं नाही आणि बाळासाहेब जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व करत होते तेव्हा शिवसेनेचा उमेदवार याच निशाणीवर निवडणूक आला होता, हेही आगामी काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ठासून सांगितलं जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाचं नवं निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाणं फारसं आव्हानात्मक असणार नाही, असंच सध्याचं चित्र असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
दुसरं म्हणजे, भाषिक आधारावर देशात राज्यांची निर्मिती झाली. मात्र महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला. या लढ्यात उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हेदेखील अग्रस्थानी होती. १०७ जणांनी ज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं धगधगती मशाल हेच प्रतिक मानलं जातं. हेच मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळाल्याने आगामी काळात उद्धव यांच्याकडून या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देत मतदारांना भावनिक साद घातली जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. महत्वाचं म्हणजे, भाजप हा गुजरातधार्जिणा पक्ष असल्याचा आरोप शिवसेनेच्या विविध नेत्यांकडून वारंवार केला जातो. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यापासून तर मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला नेले गेले, असं शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांकडून सांगितलं जातं. आता मशाल हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं प्रतिक असणारं चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा एकदा प्रादेशिक आणि भाषिक अस्मितेला हात घातला जाईल, असं मत राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंसाठी मशाल चिन्ह गेमचेंजर ठरणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.