Just another WordPress site

खाजगी TV चॅनेल्सना रोज ३० मिनिटं राष्ट्र हिताचे कार्यक्रम दाखवणं सक्तीचं; प्रसारण मंत्रालयाचे निर्देश, निर्देश देण्याची नेमकी कारणं काय?

भारतात ‘दूरदर्शन’ या पहिल्या चित्रवाणी सेवेची स्थापना १९५१ साली झाली. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव चित्रवाणी होती. त्यात राष्ट्रहित आणि सामाजिक विषयांवरील जाहिराती किंवा लघु कार्यक्रम दाखवण्यात येत असतं. मात्र ९० च्या दशकात अनेक खासगी चॅनेल्स आले. या चॅनेल्सवर अशा प्रकारचे कार्यक्रम दाखवण्यात येत नव्हते. आजही दाखवण्यात येत नाहीत. त्यामुळेच आता प्रसारण मंत्रालयाने खासगी चॅनेल्सना राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर रोज ३० मिनिटांचे कार्यक्रम दाखवण्याचे निर्देश दिले. दरम्यान, नेमके प्रसारण मंत्रालयाने काय निर्देश दिले? हा निर्णय का घेतला? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. TV चॅनेल्सवर सामाजिक कार्यक्रम दाखवणं सक्तीचं
२. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले निर्देश
३. स्पोर्ट चॅनेल आणि वाईल्ड लाईफ चॅनेल्सना वगळले
४. प्रसारण मंत्रालयाचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता

 

आपल्या घरात पहिल्यांदा चित्रवाणी संच- अर्थात टीव्ही- कधी आला, हे चाळिशी-पन्नाशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आजही हमखास आठवत असेल. ते साहजिक. १९५९ मध्ये भारतात दिल्लीत दूरचित्रवाणीचं पहिल्यांदा ‘प्रायोगिक तत्त्वावर’ प्रक्षेपण झालं. पुढं ऑगस्ट १९७४ मध्ये दूरदर्शनवर हिंदी, मराठी आणि इंग्रजी बातम्या आणि अगदी मर्यादित कार्यक्रम बघायला मिळायचे. दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण’ सुरू झाल्यानंतर हम लोग ही मालिका दाखवण्यात आली. ही मालिका सहा कोटी प्रेक्षक, ६० लाख दूरदर्शन संचांवर सरासरी पाहायचे. मद्यप्राशनाचे दुष्परिणाम, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, असे सामाजिक मुद्दे या कार्यक्रमात असायचये. याशिवाय, पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रहित आणि सामाजिक विषयांवरील जाहिराती किंवा लघु कार्यक्रम दाखवण्यात येत होते. मात्र खासगी चॅनेल्सवर अशा प्रकारच्या जाहिराती किंवा कार्यक्रम दाखवण्यात येत नाहीत. त्यामुळं आता प्रसारण मंत्रालयाने खासगी टीव्ही चॅनेल्सला सामाजिक विषयांवर दररोज ३० मिनिटांचे कार्यक्रम दाखविण्याचे निर्देश दिले.

नेमके प्रसारण मंत्रालयाने काय निर्देश दिले?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नुकतेच खाजगी टीव्ही चॅनेल्ससाठी नवीन अपलिंकिंग आणि डाऊन लिंकिंग मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. या मार्गदर्शक तत्त्वांचा भाग म्हणून सर्वच खासगी चॅनेल्सना दररोज ३० मिनिटांचे कार्यक्रम दाखविण्याचे आदेश दिले. हे कार्यक्रम राष्ट्रहित आणि सामाजिक या विषयांवर जनजागृती करतील. खासगी टिव्ही चॅनेल आणि तज्ज्ञांशी याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चर्चा केली असून कोणते कार्यक्रम दाखवावेत याबाबत स्वतंत्र सल्लागार नेमण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे विषय काय असावेत याचा निर्णय पूर्णपणे वाहिन्या घेतील. केंद्र सरकार केवळ हे कार्यक्रम प्रसारित होत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणार आहे, असे प्रसारण विभागाचे सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सांगितले. लवकरच याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे. हे कार्यक्रम प्रसारण करण्याची वेळ काय असेल यावर केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचं कारण काय?

प्रसारण मंत्रालयाने ११ वर्षांनंतर टीव्ही चॅनेल्सच्या अपलिंकिंग आणि डाऊन लिकिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीत. २००५ मध्ये प्रथम ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती आणि २०११मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या होत्या. एअरवेव्ह ही सार्वजनिक संपत्ती असल्याने समाजाच्या हितासाठी तिचा उपयोग करण्याची गरज आहे, असा विचार पुढे आल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगितले जातेय. देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल, याबद्दलचे विचार आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणे, कृषिशिक्षण देणे, कुटुंबनियोजन सारख्या विषयाची माहिती देणे, हा उद्देश ठेऊन ही मार्गदर्शक तत्ते जाहिर करण्यात आली.

कोणत्या विषयांवर कार्यक्रम दाखवले जातील?

केंद्र सरकारने वाहिन्यांना काही विषय दिले आहेत. आरोग्य आणि कुटुंबकल्याण, शिक्षण, साक्षरतेचा प्रसार, समाजातील दुर्बल घटकांतील जनतेचे सक्षमीकरण, पर्यावरण, राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक वारसा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर कार्यक्रम दाखवावे, अशा सूचना केल्या. त्याशिवाय ग्रामविकास, कृषी आणि महिला कल्याण हे विषयही चॅनेल्सना देण्यात आले. मात्र या विषयांवरील कंटेट, व्हिडिओ आणि एडिटींगबाबतचा निर्णय चॅनेल्सनी घ्यायचा असून सरकारचा याबाबत हस्तक्षेप नसणार आहे. मात्र ३० मिनिटांचे हे कार्यक्रम चॅनेल्स कडून दाखवण्यात येत आहेत की नाही यावर केंद्र सरकारचे लक्ष असणार आहे.

कोणत्या चॅनेल्सना हे कार्यक्रम दाखविणे सक्तीचं?

केंद्र सरकारने सर्व भाषांतील एंटरटेनमेंट चॅनेल्स, न्यूज चॅनेल्सना हे कार्यक्रम दाखविणे अनिवार्य केले आहे. यात फक्त स्पोर्ट चॅनेल, वाईल्ड लाईफ चॅनेल्सना आणि परदेशी चॅनेल्सना हे कार्यक्रम दाखविणे अनिवार्य नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, सरकारकडून कोणत्या चॅनेल्सना हे कार्यक्रम दाखवणं अनिवार्य आहेत, त्या चॅनेल्सची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

पूर्वी दूरदर्शनवर कोणते सामाजिक कार्यक्रम होते?

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रहित आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक जाहिराती, कार्यक्रम दाखवण्यात येत होते. राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व सांगणारे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे विविधभाषी गीत, मशाल घेऊन धावणारे क्रीडापटू, साक्षरतेचा प्रसार करणारे ‘पूरब से सूर्य उगा’ हे गीत, लोकसंख्या नियंत्रणाबाबत माहिती देणारी ‘एक किंवा दोन बस्स’ ही जाहिरात दाखवण्यात येत असे. याशिवाय सामाजिक जागृती करणारे विविध लघुपट, गीत, कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्यात येत असतं.

मार्गदर्शक तत्वे वादग्रस्त ठरण्याची शक्यता का?

खासगी टीव्ही चॅनेल्ससाठी एकेक सेकंद त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. अशा वेळी ३० मिनिटांचा सरकारी कार्यक्रम दाखवण्याची सक्ती कशासाठी, असा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित होतो. याशिवाय, राष्ट्रीय हिताचे म्हणजे नेमके काय, याविषयी स्पष्टता नाही. शिवाय खासगी चॅनेल्स म्हणजे खासगी आस्थापना असल्यामुळे काय दाखवावे याविषयीचे स्वातंत्र्य त्यांना असले पाहिजे, असे या क्षेत्रातील विश्लेषक सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!