बेंगळुरू न्यायालयाने कॉपीराइट उल्लंघनाच्या खटल्यात काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले. भारत जोडो यात्रेच्या थीम साँगमध्ये केजीएफ चित्रपटातील गीताचा अंश वापरण्यात आला. त्याविरोधात एमआरटी म्युझिकने राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. दरम्यान, तुम्हीही सोशल मीडियावर रील बनवत असाल तर तुमच्यावरही एफआयआर दाखल होऊ शकतो. त्यामुळं कॉपीराईट म्हणजे काय? रील बनवतांना काय काळजी घ्यावी? याच विषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. बेंगळुरू कोर्टाचा काँग्रेस, ‘भारत जोडो’ला धक्का
२. ट्विटर हँडलवर बंदी घालण्याच्या केल्या सूचना
३. देशात कॉपीराइट कायदा १९५७ लागू आहे
४. कॉपीराइटचे उल्लंघन केलं तर १ वर्षांचा कारावास
नेमकं प्रकरण तरी काय?
बेंगळुरूतील न्यायालयाने ट्विटरला सांगितले की, कॉंग्रेसकडून ‘KGF Chapter-2’ चित्रपटाच्या साउंड रेकॉर्डचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला. त्यामुळं MRT म्युझिकच्या मालकीच्या वैधानिक कॉपीराइटचे उल्लंघन झाले. परिणामी, कोर्टाने काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. MRT म्युझिकने शुक्रवारी ही तक्रार नोंदवली होती. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर कॉपीराइट कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता या कायद्यांच्या तरतुदींनुसार दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये, MRT म्युझिकने सांगिलते की, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यात्रेचे दोन व्हिडिओ ट्विट केले होते. या ट्विटमध्ये KGF-2 ची लोकप्रिय गाणी परवानगीशिवाय वापरली गेली होती.
कॉपीराइट म्हणजे काय?
जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे झालं तर याचा अर्थ दुसऱ्याची मालमत्ता चोरणं असा होतो. या चोरीचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचे पैसे किंवा अन्य काही मौल्यवान वस्तू चोरत आहात. समजा, जर तुम्ही एक अल्बम बनवला, त्यात ५ गाणी होती. तुम्ही या गाण्यांचे दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती केली. आता दुसरा कोणी तोच अल्बम चोरून स्वतःच्या नावाने विकू लागला, तर ते ते कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे. थोडक्यात काय तर, कॉपीराइट ही कायदेशीर बाब आहे. एखाद्या रचनेची निर्मिती करणाऱ्याचे त्या रचनेवर ६० वर्ष हक्क असतात. मुळं रचिता ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. मात्र, त्या कंपनी किंवा व्यक्तीशिवाय, अन्य कोणीही ती रचना वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
कॉंग्रेसचे प्रकरण कॉपीराइटच्या कक्षेत कसे येणार?
खरं तर मुळ कलाकृतीच्या रचित-कर्त्याला किंवा त्याच्या निर्मात्याला कोणत्याही कलाकृतीवर पूर्ण कायदेशीर अधिकार असतात. त्यात लेखन, संगीत आणि चित्रपट या बाबींचा समावेश होतो. यातील कुठलाही सामग्री ही वैयक्तीक कारणांसाठी वापरली जाऊ शकते. मात्र, त्याचा प्रसार आणि व्यावसायिक हेतूंसाठी वापर करणे कॉपीराइटचे उल्लंघन आहे. काँग्रेसने आपल्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये केजीएफचे संगीत वापरले. यासाठी त्यांनी ना संगीत निर्मात्याची परवानगी घेतली ना त्यांना श्रेय दिले. त्यामुळे ही बाब कॉपीराइट उल्लंघनाच्या कक्षेत येते.
देशात कॉपीराईट अॅक्ट आहे का?
तर याचं उत्तर हो असं आहे. देशात कॉपीराइट कायदा १९५७ लागू आहे. हा कॉपीराइट कायदा तुमच्या कामाचे संरक्षण करण्यासाठी काम करतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, मालक किंवा निर्मात्याला कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या कामाचे अधिकार मिळतात. एक महत्वाची बाब म्हणजे, कॉपीराईट कायद्यांतर्गत इतर कोणावर खटला भरायचा असेल तर तुम्ही ज्यासाठी कॉपीराइट केस दाखल करणार आहात, ती तुमची स्वतःची निर्मिती असावी. किंवा त्या गोष्टीचे सर्व कॉपीराइट तुमच्याकडे असावेत.
परवानगी न घेता दुसऱ्याचे गाणे वापरणे हे गुन्हा आहे का?
खरंतर इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर, जे रील आणि शॉर्ट्समध्ये संगीत किंवा गाणी जोडण्याचा पर्याय देतात, त्यांचे स्वतःचे इनबिल्ट संगीत कॅटलॉग आहेत. या कॅटलॉगमधील गाण्यांसाठी, हे प्लॅटफॉर्म स्वतः त्यांच्या मालकांकडून किंवा निर्मात्यांकडून हक्क घेतात. मात्र, जर आपण त्यांच्या कॅटलॉगमधून संगीत किंवा गाणी घेतली नाही आणि गाणे व्हिडिओमध्ये टाकून ते इन्स्टा, फेसबुक किंवा यूट्यूबवर शेअर केले, तर ते कॉपीराइटचे उल्लंघन होते. त्यासाठी शिक्षा देखील होऊ शकते.
कॉपीराईट कायद्यांतर्गत शिक्षेती तरतूद काय?
कॉपीराइटचे उल्लंघन केल्यास आणि दोषी आढळल्यास १ वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय, दंड देखील आकारला जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे, काही प्रकरणांमध्ये कॉपीराइटचे उल्लंघन करून एखाद्याने कमावलेल्या नफ्यात हिस्सा मिळवण्याचा देखील दावा केला जाऊ शकतो.