Just another WordPress site

न्यूझीलंडमध्ये पडला प्लास्टिक पाऊस, प्लास्टिक पाऊस म्हणजे काय? मानवी आरोग्यासाठी प्लास्टिक पाऊस किती धोकादायक आहे?

प्लास्टीकचा पाऊस किंवा प्लास्टीकचे धुकं म्हटलं की अनेकांना नवल वाटू शकते. कारण, पाऊस म्हटलं की आभाळातून पडणारा पाण्याचा पाऊस इतकंच आपल्याला माहित असतं. फार फार तर बर्फाळ प्रदेशात होणारा हीमवर्षाव आपल्याला माहित असतो. मात्र, जगातील काही देशांमध्ये सध्या प्लास्टिकचा पाऊस पडतोय, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये पडलेल्या पावसानंतर घराच्या छतांवर प्लास्टिकचे ५ हजार सुक्ष्मकण आढळून आलेत. तर वर्षभरात ७४ मेट्रिक टन प्लास्टिकचे कण पडल्याची माहितीही पुढे आलीये. दरम्यान, हा प्लास्टिकाचा पाऊस नेमका का पडतो? याचा मानवी आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? याच विषयी जाणून घेऊ.

प्लास्टिक पाऊस म्हणजे काय?

वायू प्रदूषणाची समस्या आणि त्यापासून होणार्‍या गंभीर परिणामा आपल्याला ठाऊकच आहेत. पण, आता प्लास्टिकचा पाऊस पडू लागला, तर आश्चर्य वाटायला नको, असे संशोधकांचं मत आहे. प्लास्टिकचा पाऊस ही कुठलीही काल्पनिक संकल्पना नसून, आता हे संकट एक भीषण वास्तव म्हणून जगापुढे आ वासून उभं राहिलंय. जगातील अनेक देशांत पावसाच्या पाण्याबरोबरच प्लास्टिकचे सुक्ष्मकणही जमिनीवर पडत आहेत, त्यालाच ‘प्लास्टिक पाऊस’ असं म्हणतात. या प्लास्टिक कणांचा आकार साधारण ५ मिलीमीटर इतका असतो. आणि हे तेच प्लास्टिक आहे, ज्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. एका रिपोर्टनुसार, आपण जे प्लास्टिक वापरतो, त्याचा वापर केल्यानंतर ते प्लास्टिक आपण कचराकुंडीत किंवा कुठंतरी फेकून देतो. हेच प्लास्टिक पुढे समुद्रापर्यंत पोहोचते. आणि नंतर त्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे तेच प्लास्टिक सुक्ष्मकणांच्या स्वरूपात पावसाबरोबर पुन्हा जमिनीवर पडतं.

प्लास्टिकचे कण डोळ्यांनी बघता येतात?

अनेकांना प्लास्टिक पाऊसाबाबत माहिती नसली, तरी हवेत सर्सास प्लास्टिकचे कण असतात. हे प्लास्टिकचे कण उघड्या डोळ्याने दिसत नसले, तरी UV लाईटच्या मदतीने ते आपल्याला ते बघता येतात. गंभीर बाब म्हणजे आपल्या घरातदेखील हे कण आढळून येतात.
सायन्स जर्नलच्या एका संशोधनानुसार, अमेरिकेतील सर्वात कमी प्रदूषित भाग असलेल्या दक्षिणी राष्ट्रीय उद्यानात यंदा १४ महिने पाऊस पडला. यावेळी पावसाबरोबर एक हजार मेट्रिक टन प्लास्टिकचे कण जमिनिवर पडले. विशेष म्हणजे हा भाग शहराच्या बाहेर असून याठिकाणी प्रदूषण देखील सर्वात कमी आहे. वैज्ञानिकांच्या मते २०३० पर्यंत अमेरिकेत ४६० मेट्रीक टन प्लास्टिक कण पडण्याची शक्यता आहे. तर ‘एन्व्हायर्न्मेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलीये. त्यामध्ये सांगितलं की, ऑकलंड शहराच्या छतांवर प्रत्येक चौरस मीटरमध्ये एका दिवसात मायक्रोप्लास्टिकचे सरासरी ५ हजार कण पडतात. दरम्यान, याबाबत भारतात कोणतंही संशोधन झालं नसून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर असेल, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला.

प्लास्टिक पाऊस किती धोकादायक?

या पावसाचा कुठलाही गंध किंवा स्वाद नसतो. मात्र, त्याचे परिणाम इतके भयंकर असतात की, ज्यामुळे दुर्धर आजारांशी संपूर्ण मानवजातीसह प्राणिमात्रांनाही सामना करावा लागतो. याबद्दलचा अहवाल नुकताच न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठात प्रसिद्ध करण्यात आला. तर २०२१ मध्ये झालेल्या संशोधनानुसार, एका व्यक्तीच्या शरीरात श्वसनाद्वारे दररोज ७ हजार प्लास्टिक कण आत जातात. हे जवळपास धुम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाप्रमाणेच आहे. या प्लास्टिक कणांचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याबाबत माहिती उपलब्ध नसली, तरी यामुळे श्वसनक्रिया आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!