Just another WordPress site

निवडणूक लागली, घरातले पिस्तूल पोलिसांत जमा केले का?

आचारसंहिता लागू होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रियाही सुरू

 

नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections)प्रचाराने वेग घेतला असताना पोलिस व जिल्हा प्रशासन यंत्रणेकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यावरदेखील भर देण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशांनुसार आचारसंहिता लागू झाल्याबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून संबंधित परवानाधारक शस्त्र (A licensed weapon) जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागपुरात हजाराहून अधिक परवानाधारक पिस्तूलधारक असून जर कुणी त्यांचे शस्त्र प्रशासनाकडे जमा केले नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून अवैधपणे पिस्तूल, माऊझर तसेच देशी कट्टे आरोपींकडे असल्याची बाब वारंवार उघडकीस आली आहे. त्याचप्रमाणे शहरात हजारांहून अधिक पिस्तूल परवानाधारक आहेत. आत्मरक्षणासाठी तसेच सुरक्षेसाठी अत्यावश्यक असणाऱ्यांनाच पोलिसांकडून (Nagpur Police) पडताळणीनंतर परवाना देण्यात येतो. नियमांनुसार निवडणूक काळात संबंधितांनी आपले शस्त्र संबंधित नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करणे गरजेचे आहे अन्यथा प्रशासनाकडून पुढील कारवाईसुद्धा होऊ शकते.

सर्वसाधारणतः जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया राबविली जाते. स्वसंरक्षणासाठी हा शस्त्र परवाना दिला जातो. शस्त्र परवाने असलेल्यांमध्ये लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, मोठे व्यापारी यांचादेखील समावेश आहे. आर्म अॅक्ट १९५९ नुसार भारत सरकारने नागरिकांना शस्त्र परवाना घेण्याची प्रविधा असर दिली आहे.

पोलिसांकडून सर्वांना तातडीने सूचना
■ निवडणूक जाहीर होताच पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत संबंधितांनी ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपण राहतो तेथे सदरील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
■ याबाबत पोलिस विभागाकडून संबंधितांशी पत्रव्यवहार, संपर्क साधून शस्त्र जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेकांनी हे शस्त्र जमा केले आहेत.
■ जिल्हा छाननी समिती कोणाची पिस्तुले जमा करायची याचा निर्णय घेते. जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती सर्व ठाणेदारांना जमा करण्याचे निर्देश देते.
■ प्रामुख्याने निवडणूक काळातील दंगलीत थेट सहभागी, गुन्हे दाखल झालेले या वर्गवारीतील परवानाधारकांची अग्निशस्त्रे जमा करून घेण्यात येतात. तसेच त्यांचे पोलिस रेकॉर्ड देखील पाहण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!