Seat allocation of Mahayuti and Mahavikas Aghadi : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal)साताऱ्यामधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांविरोधात (Amol Kirtikar) शिंदे गटाकडून अभिनेता गोविंदाऐवजी आता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) या मराठी अभिनेत्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे भागवत कराड (Bhagwat Karad) तर बीडमधून शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून ज्योती मेटे (Jyot Mete) यांच्या नावावर खल सुरू आहे.
ज्याला पाडायचे त्याला पाडा मनोज जरांगे यांचे आवाहन; कोणालाही पाठिंबा नाही
महायुती व महाविकास आघाडीतील लोकसभा जागावाटपाबाबतचा काथ्याकूट मागील महिनाभरापासून सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी सध्या प्रत्येकी चार-पाच जागांवरील तिढा कायम आहे. महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, दक्षिण मुंबई, ठाणे या मतदारसंघांवरून वाद सुरू आहे. नाशिकवगळता सध्या या मतदारसंघातील खासदार ठाकरे गटाचा आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमचा खासदार असला तरी शिंदे गटासह भाजपने त्यावर आपला दावा ठोकला आहे. संभाजीनगरमध्ये भाजपला केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना लोकसभेच्या मैदानात उतरवत आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथे मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव पुढे केले आहे. भाजप तेथील आपला दावा कोणत्याही परिस्थितीत सोडण्याच्या तयारीत नाही.त्यामुळे तिढा कायम आहे.
इच्छा नसली तरी नारायण राणे लोकसभा मैदानात ?
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाव निश्चित केले आहे, पण तेथे शिंदे गटाचे किरण सामंत प्रचंड इच्छुक आहेत. राणेंना लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही, पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नाव निश्चित केल्याने त्यांचा नाइलाज झालेला आहे. पक्षाने देऊ केलेले तिकीट नाकारल्यास भविष्यात पक्षाकडे काहीही मागता येणार नाही व राजकीय संन्यास घ्यावा लागेल, ही भीती असल्याने राणेंनी इच्छा नसूनही पक्षाला अद्याप नकार कळवलेला नाही. दुसरीकडे, किरण सामंतांनी कमळावर लढण्यास नकार दिला. धनुष्यबाणावरच लढेन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या केवळ नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा सुरूच असल्याचे चित्र आहे.
बीडमधून ज्योती मेटेंसाठी एक गट आग्रही
बीडमधून महायुतीकडून पंकजा मुंडे मैदानात असतील. पंकजा यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे यांच्यापैकी एक जण असेल. सोनावणेंना विधानसभेला माजलगावमधून संधी द्यावी तर आता ज्योती मेटेंना लोकसभेला संधी द्यावी, अशी पक्षातील एका गटाची मागणी आहे. विनायक मेटेंचे मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाताना निधन झाले, त्यामुळे मराठा समाजात मेटे कुटुंबीयांबाबत सहानुभूती असून त्याचा ज्योती मेटेंना फायदा होईल, असे गणित पक्षातील या गटाकडून मांडले जात आहे. गेली अनेक वर्षे बीडमध्ये मुंडे कुटुंबांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे बीडमधील संपूर्ण मराठा समाज मेटेंच्या मागे उभा राहू शकतो, असा दावा केला जात आहे. त्यामुळे शरद पवार आता सोनावणेंना संधी देणार की ज्योती मेटेंना, हे पहावे लागेल.
धाराशिवमध्ये प्रवीण परदेशी उमेदवार?
धाराशिववर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे, पण तेथे महायुतीतील तीनही पक्षांकडे ओमराजे निंबाळकरांना टक्कर देऊ शकेल असा तगडा उमेदवारच नाही. त्यामुळे तेथील जागा कोणीही लढवली तरी तेथे प्रवीण परदेशी यांचे नाव आघाडीवर आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा विचार सुरू आहे; पण त्यांनी विजयाची शक्यता नसल्याने नकार कळवला आहे. तरीही फडणवीस गेले चार दिवस राणा जगजितसिंह यांच्याशी सातत्याने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी भाजप ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडून घड्याळाच्या चिन्हावर प्रवीण परदेशींना मैदानात उतरवू शकते.
हेमंत गोडसेंना विरोध कायम; छगन भुजबळांची लॉटरी लागणार
महायुतीत नाशिकमध्ये तर वेगळाच तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी द्या, असा आदेशच मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस- अजित पवारांना दिल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी आगामी काळात ‘ओबीसी कार्ड’ खेळणार असल्याने मोदी-शाह यांना भुजबळांसारखा मोठा ओबीसी नेता दिल्लीत हवा आहे. दिल्लीतून आदेश आल्याने नाशिकमध्ये विद्यमान खासदार असूनही मुख्यमंत्री शिंदे हे हेमंत गोडसेंसाठी काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे चार वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्यानंतर आणि शक्तिप्रदर्शन केल्यानंतरही गोडसेंना मुख्यमंत्री शिंदे उमेदवारीबाबत कोणतीही ग्वाही देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच गोडसेंनी प्रचार सुरू केला आहे. हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध कायम आहे. पण आता भुजबळांचे नाव पक्षश्रेष्ठीकडून आल्याने ‘आता काय करायचे?’ असा प्रश्न नाशिकमधील भाजप नेत्यांना पडला आहे. पण पक्षश्रेष्ठीचे आदेश असल्याने भुजबळांच्या नावाला ते विरोध करू शकणार नाहीत. खा. उदयनराजेंसाठी सातारची जागा भाजपला सोडून, भुजबळांसाठी नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे सांगितले जाते.
उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण लढत ?
सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे यांचे नाव निश्चित झाले आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्याने उदयनराजेंना उमेदवारी देणे महायुतीची गरज बनली आहे. ही बाब अजित पवारांना पटवून देण्यात भाजप यशस्वी झाल्याने उदयनराजे कमळाच्या चिन्हावर मैदानात असतील. आता महाविकास आघाडीकडून उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव पुढे केले आहे.
२०१९ मध्ये उदयनराजे राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी घेण्याची गळ घातली होती. पण उदयनराजेंशी संबंध चांगले असल्यामुळे व निवडून यायची खात्री नसल्याने पृथ्वीराज यांनी नकार दिला होता. त्या पोटनिवडणुकीत पवारांनी आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना उतरवून निवडून आणून दाखवले होते. आता पुन्हा एकदा शरद पवारांनी चव्हाणांना काँग्रेसकडून लढण्याची विनंती केली आहे. साताऱ्याच्या बदल्यात पवारांनी भिवंडी मतदारसंघ मागितला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी नकार दिल्यास पवार शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना मैदानात उतरवू शकतात. यापैकी एकाला उमेदवारी दिल्यास अजित पवार गटही त्यांना छुपी मदत करू शकतो.
दक्षिण मुंबई, ठाण्यावरून भाजप- शिंदे गटात तिढा कायम
दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आहे. मध्यंतरी मनसेला सोबत घेऊन तेथे बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. पण मनसे- भाजप महायुतीला दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या अडचणी उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसे महायुतीत जाण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दक्षिण मुंबईत काय होणार याची उत्सुकता कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे आपला गड असल्याचे सांगत भाजपला मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. ठाण्यातील दोनपैकी एक जागा भाजपला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत; पण शिंदेंचा नकार कायम आहे. शिंदेंनी तेथे प्रताप सरनाईक यांचे नाव पुढे केले आहे. आता महायुतीचे नेते यातून मार्ग कसा काढताहेत ते पाहावे लागेल.
उत्तर पश्चिम मुंबईमधील उमेदवाराबाबत उत्सुकता
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिली आहे. तेथे शिंदे गटाकडून खासदार गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कापला जाणार आहे. तेथे शिंदे गटाकडून अभिनेता गोविंदाला तिकीट देण्यासाठी पक्षप्रवेश केला. मात्र, गोविंदा सक्षम उमेदवार होऊ शकत नाही, असा सूर महायुतीतून उमटू लागला आहे. २००४ ते २००९ या काळात काँग्रेसकडून खासदार राहिलेला गोविंदा १५ वर्षांनंतर राजकारणात परतला आहे. खासदार असताना गोविंदा मतदारसंघात फिरकला नसल्याचा अनुभव लोक सांगत आहेत. शिवाय बॉलीवूडपासून तो दुरावला असल्याने त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे गोविंदांऐवजी मराठी अभिनेते व हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या शरद पोंक्षे यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. पोंक्षेशिवाय इतर काही नावांचा समावेश आहे. करिना कपूर व करिश्मा कपूर या बहिणीशी महायुतीची बोलणी सुरू आहे. कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, त्याची उत्सुकता आहे..